धुळे, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात गेल्या एप्रिलपासून सुरू झालेले कोरोना विषाणूचे
(COVID19) संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही.
या विषाणूच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गडद होत आहे. अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दिवाळीचा सण राज्य शासनाच्या नियमांचे पालन करीत घरगुती वातावरणात आणि साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव,
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित,
धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख यांनी केले आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 13 हजार 540 रुग्ण आढळून आले आहेत.
त्यापैकी 375 रुग्णांचा मृत्यू झाला,
तर 12 हजार
884 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या 281 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या माध्यमातून औषधोपचार सुरू आहेत. राज्य शासनाने मिशन बिगेन अगेन सुरू केले आहे. जवळपास सर्व प्रकारच्या आस्थापना सुरू झाल्या आहेत. बस सेवाही सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वर्दळ वाढली आहे. त्यातच पुढील आठवड्यापासून दिवाळीचा सण सुरू होत आहे. कोरोना विषाणूच्या कालावधीत यापूर्वी आलेले सर्वधर्मीय सण, उत्सव नागरिकांनी घरगुती वातावरणात आणि साध्या पध्दतीने साजरे केले आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिवाळीच्या सणात नागरिकांनी अशाच प्रकारचे सहकार्य करावे.
नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करावे. जेणेकरून कोरोना विषाणूची साखळी खंडित करणे शक्य होईल.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बंद असलेली धुळे जिल्ह्यातील धार्मिकस्थळे अद्याप खुली झालेली नाहीत. त्यामुळे दिवाळीचा सण नागरिकांनी घरगुती स्वरुपात आणि मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक,
लहान मुले,
बालके घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर अवश्य करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
जेणेकरून कोरोना विषाणूचा संसर्ग,
संक्रमण वाढणार नाही.
दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा सण होय. या उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली जाते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. या प्रदूषणाचा नागरिक आणि प्राण्यांवर विपरित परिणाम होतात.
कोरोना विषाणूमुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होवून त्रास होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या वर्षी फटाक्यांची आतषबाजी टाळावी.
त्याऐवजी दिव्यांची आरास,
रोषणाई करून दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करावा.
या काळात कोणत्याही प्रकारची गर्दी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. त्याऐवजी ऑनलाइन माध्यमांचा वापर करावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक शिबिरांना प्राधान्य द्यावे.
त्यातही रक्तदान शिबिर घ्यावे. नागरिकांमध्ये कोरोना विषाणू,
मलेरिया, डेंग्यू या आजारांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करीत प्रतिबंधात्मक उपचारांची माहिती द्यावी.
याशिवाय घर, परिसरात नागरिकांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक श्री.
पंडित, धुळे महानगरपालिकेचे आयुक्त श्री.
शेख यांनी केले आहे.
नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील
सूचना अंमलात आणाव्यात
·
कुटुंबातील सदस्यांनी
शक्यतो वेगवेगळ्या स्वरुपाचे मास्क वापरावेत किंवा स्वत:च्या मास्कला वेगळी खूण करावी
·
एकमेकांचे मास्क वापरू
नयेत
·
पुरेसा व योग्य वेळी
आहार, पुरेशी झोप, व्यायाम,
योग, प्राणायाम करून प्रतिकार शक्ती वाढवावी
·
वाहन चालविताना किंवा
प्रवास करताना मास्कचा वापर करावा
·
बंदिस्त वातावरण, गर्दीत जाणे टाळावे
·
सार्वजनिक ठिकाणी
थुंकू नये
·
दरवेळी बाहेरून किंवा
कार्यालयातून घरी परतल्यावर सर्वप्रथम आंघोळ करावी
·
कपडे धुण्यासाठी थेट
एका बादलीत टाकावेत
·
कोरोना विषाणूची लक्षणे
आढळून आली, तर कोणाकोणाला भेटलो याची नोंद ठेवावी.
·
कौटुंबिक स्तरावर
वावरताना कोरोना विषयक सूचनांचे उल्लंघन होत असल्यास ते एकमेकांच्या निदर्शनास आणावे
·
कुटुंबातील ज्येष्ठ
सदस्य, मुलांच्या प्रकृतीमानाकडे विशेष लक्ष
द्यावे
·
मोबाईलसारख्या वस्तू
नियमितपणे स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी
·
भाज्या, फळे आदी स्वच्छ धुवून ठेवावेत. त्यानंतरच
त्यांचा आहारात वापर करावा
·
कॉलनी, गावात वावरताना प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक
·
सार्वजनिक ठिकाणी
एकत्र येणे टाळावे
·
खरेदीला जाताना शक्यतो
कुटुंबातील एकाच व्यक्तीने जावे, कमी गर्दीच्या वेळेत जाण्यास
प्राधान्य द्यावे
·
दुकान किंवा दुकानाबाहेरही
सुरक्षित अंतर ठेवावे, कठड्यांना स्पर्श करू नये
·
कार्यालयात कर्मचाऱ्यांनी
सुरक्षित अंतर ठेवावे
·
गरजेनुसार कर्मचाऱ्यांना
कार्यालयात बोलवावे तसेच कामकाजाच्या वेळा विभागून द्याव्यात
·
कार्यालयातील हवा
खेळती ठेवण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवाव्यात
·
वातानुकूलित यंत्रणेचा
वापर टाळावा
·
मास्क समवेत फेस शिल्डचाही
वापर करावा
·
वाहनांमध्ये दाटीवाटीने
प्रवास करू नये