शिरपूर : भरड धान्य (मका, ज्वारी, बाजरी) ची खरेदी पूर्णपणे पारदर्शीपणे होणार असून माजी मंत्री अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या सर्व प्रयत्नांना यश आले आहे.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन प्रकाश भोमा गुजर, ऍड. बाबा पाटील,
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक भरत पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, मांडळचे माजी सरपंच भटू माळी, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, भाजपचे अनेक पदाधिकारी, अनेक शेतकरी यांच्या प्रयत्नाने दि. ५ नोव्हेंबर गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे जाऊन जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या हिताची मागणी करण्यात आली होती. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता.
जिल्हाधिकारी संजय यादव यांनी तातडीने या बाबीची दखल घेऊन चौकशी करण्याचे व योग्य ती अंमलबजावणी करण्याचे संबंधित अधिकारी व प्रशासनाला आदेश दिले. यानुसार जिल्हा मार्केटिंग ऑफीसर श्री. सोनवणे यांनी शिरपूर तालुका खरेदी विक्री संघाला दि. ६ नोव्हेंबर रोजी पत्र देऊन संबंधित सचिवाकडून पोर्टल बाबतचे कामकाज काढून घेण्याचे आदेश देऊन त्याकामी नवीन कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार खरेदी-विक्री संघाने देखील अंमलबजावणी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार आबा महाजन यांनी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांना आदेश बजावले असून सोमवारी दि. ९ नोव्हेंबर रोजी पोर्टल वर नाव नोंदणी केलेल्या यादीतील सर्व शेतकऱ्यांची प्रत्यक्षात भरडधान्य साठवणूक बाबतचा पंचनामा करण्यात येणार आहे. १९८ शेतकरी बांधव यांच्या मालाबाबत प्रत्यक्ष पंचनामे करण्यासाठी सोमवारी ३७ गावांना कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी हे हजर राहतील. त्यानुसार योग्य सर्व पात्र शेतकऱ्यांचे नाव नोंदणी करण्यात येणार आहे. पूर्णपणे पारदर्शकतेने शेतकऱ्यांचे भरडधान्य माल पोर्टल वर नाव नोंदणी व खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकरी बांधव यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शासनाच्या खरेदी धोरण व आदेशानुसार दि. १ नोव्हेंबर २०२० पासून पोर्टलवर नावनोंदणी करण्याचे काम सुरू झाले होते. परंतु एकाच दिवशी पोर्टलवर ३६४ नावांनी नोंदणी केली. सदरची नोंदणीत काही नावे बोगस पीक पाहणी लावून, शेतकऱ्यांचे सातबारा उतारे हे काही व्यापाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी नोंदणी केलेले आहेत, असा संशय आला. सदर नोंदणी ही पैसे घेऊन करण्यात आलेली आहे याबाबत लोकांच्या तक्रारी होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. या तक्रारीची दखल घेऊन पारदर्शकता आणून अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. पोर्टलवर नाव नोंदणी व माल खरेदी पर्यंत या प्रक्रियेत आता शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक प्रतिनिधी, शिरपूर खरेदी विक्री संघाचा एक, जिल्हा मार्केटिंग ऑफिसर कडून एक प्रतिनिधी, तहसील कार्यालयाकडून एक असे चार प्रतिनिधी कामकाज हाताळतील.
या निर्णयामुळे आमदार काशीराम पावरा यांनी समाधान व्यक्त केले असून शिरपूर शहर व तालुक्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेतकरी, व्यापारी, नागरिक यांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

