■■ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणास सुरूवात




नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :-  शासनाने कोरोनाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली असून त्यात 359 पथकांचा सहभाग आहे.

              दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणात जे कुटुंब बाहेरगावी गेले होते त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणे प्रत्येक घरी जावून ऑक्सिजन पातळी व थर्मल गनद्वारे ताप मोजण्यात येणार आहे. 

              दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणासाठी अक्कलकुवा तालुक्यात 50, धडगाव 47, नंदुरबार 80, नवापूर 61, शहादा 90 आणि तळोदा तालुक्यात 31  पथक नेमण्यात आले आहेत. पथकात आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती  तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अतिजोखिमीच्या व्यक्तींना दुसऱ्या टप्प्यात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शनही करणार आहे. एखाद्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ स्वॅब चाचणी मोबाईल टीमद्वारे करून घेण्यात येणार आहे.

                दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत  3 लाख 74 हजार 188 घरापैकी एकूण 1 लाख 9 हजार 205 अधिक घरांना भेटी देण्यात आल्या आहेत.  नंदुरबार तालुक्यातील 1 लाख 11 हजार 997, अक्कलकुवा 32 हजार 329, धडगाव 44 हजार 947, नवापूर 1 लाख 34 हजार 435, शहादा 1 लाख 22 हजार 335 आणि तळोदा तालुक्यातील 36 हजार 725 असे एकूण 4 लाख 82 हजार 768 नागरीकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

                पहिल्या टप्प्यात नागरिकांनी चांगले सहकार्य केल्याने  91 टक्के नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्यापैकी 84 टक्के नागरिकांच्या ऑनलाईन नोंदीदेखील पूर्ण करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आरोग्य पथकाला तपासणीसाठी सहकार्य करुन प्रत्येकानी तपासणी करुन घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने