शहादा (प्रतिनिधी) :- लक्कडकोट (ता.शहादा) येथील प्रमिलाबाई युवराज वसावे या गरोदर मातेच्या उपचारासाठी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने महिलेचा व दुसऱ्या बाळाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्या महिलेचा मृत्यूस कारणीभूत असणान्या वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका चालकावर यांवर कारवाई करावी अशी मागणी शहादा-तळोदा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लक्कडकोट (ता.शहादा) येथील प्रमिलाबाई युवराज वसावे या गरोदर मातेला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यास रुग्णवाहिका क्रमांक (एम. एच. १४ , सी एल १०५८) चे चालक राजू वाडीले व त्यावरील वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास पाटील हे जबाबदार आहेत. सदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी १०८ या रुग्णवाहिकेचे चालक व त्यावरील डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला आसता चालकाने प्रसंगाचे गांभीर्य न ओळखता मला यायला एक ते दोन तास लागतील असे बेजबाबदार पणे वक्तव्य केले व डॉक्टर साहेब घरी आंघोळ करीत असल्याने त्यांना यायला उशीर लागेल असे सांगून कामचुकार पणा करत असल्याचे सिद्ध झाले . सदर गरोदर मातेच्या नातेवाईकांनी शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या स्वीय सहाय्यक हेमराज पवार यांना संबंधित घटनेबाबत माहिती दिली असता स्वीय सहाय्यक पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः रुग्णवाहिके जवळ जाऊन चौकशी केली संबंधित रुग्णवाहिका उभी असल्याचे आढळून आले व रुग्णवाहिका चालक हा बाजारात फिरताना दिसून आला . संबंधित नातेवाईकांनी गरोदर मातेस रिक्षाने लक्कडकोट हुन म्हसावद (ता.शहादा) येथे उपचारासाठी नेत असताना रिक्षातच त्या मातेची प्रस्तुत झाली त्यात एका नवजात बालकाचा जन्म झाला व सरकारी रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासले असता योग्य त्यावेळी उपचार न मिळाल्याने गरोदर माता व तिच्या गर्भात असलेले दुसरे बाळ हे ही मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले .
१०८ रुग्णवाहिका तसेच संबंधित डॉक्टर वेळेवर पोहोचले असते तर कदाचित निष्पाप जीवाचा अंत झाला नसता सदरील बाब अत्यंत निंदास्पद तसेच काळीमा फासणारी आहे . श्री पवार यांनी रूग्णवाहिका चालक व डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला असता दोघांनी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अपमानकारक व अरेरावीची भाषा वापरून तुम्ही आमदारांचे स्वीय सहाय्यक असले तर काय झाले ? आम्हाला वैयक्तिक कामे नाहीत का ? असे सांगितले . दुर्दैवाने या दरम्यान सदर गरोदर माता व तिचा एक बाळ दगावले या सर्व प्रकाराला बेजबाबदार अकार्यक्षम रुग्णवाहिका चालक व डॉक्टर हेच असून या दोघांच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीवांना प्राण गमवावा लागला. लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून चालक व डॉक्टर यांना तत्काळ बडतर्फ करण्यात येऊन त्यांच्यावर महिला व बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी विनंती आ. पाडवी यांनी पत्राद्वारे केली आहे . या प्रकरणी विधानसभेत आदिवासी महिलेचा मृत्यू बाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी त्यांच्या पत्रात दिली आहे.
Tags
news
