शिरपूर : पंतप्रधान फळपिक विमा योजना अंतर्गत केळी व पपई पिकांचा रोजगार हमी योजना व फलोत्पादन मध्ये समावेश करण्यात यावा अशा मागणीचे पत्र माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी, फलोत्पादन विभागाचे मंत्री संदिपान भुमरे यांना त्यांच्या गावी जाऊन प्रत्यक्ष भेटून शिरपूर तालुक्यातील आमदार काशिराम पावरा यांच्यासह शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.
दि. २७ ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक भरत पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ऍड. बाबा पाटील यांनी रोजगार हमी व फलोत्पादन विभागाचे मंत्री संदिपान भुमरे यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली. रेणुका शरद सहकारी साखर कारखाना, मिरखेडा ता. पाचोळ जिल्हा बीड येथे कारखाना साईटवर भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत औरंगाबाद येथील भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश पवार, गौरव पाटील हे देखील उपस्थित होते.
रोजगार हमी व फलोत्पादन विभागाचे मंत्री संदिपान भुमरे यांना माजी मंत्री अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांचे पत्र देण्यात आले असून या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील इतर फळपिकांसाठी, रोप लागवडीसाठी, रोपांसाठी, खतांसाठी व मजुरीसाठी अनुदान देय आहे. रोपवाटिकेतून केळी व पपई चे रोप जास्त किमतीचे मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी तो खर्च न परवडणारा आहे. इतर फळपिकांच्या शासन निर्णयाच्या निकषाप्रमाणेच केळी व पपई या पिकांचा देखील समावेश व्हावा. शिरपूर तालुक्यात आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात असल्याने आदिवासी बांधवांना मिळालेल्या वनपट्टे जमिनीचा देखील या रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात यावा. अल्पभूधारक तसेच मोठ्या शेतकऱ्यांना देखील शासनाच्या या योजनेचा लाभ मिळावा असे पत्रात म्हटले आहे.
याबाबत रो. ह. यो. व फलोत्पादन विभागाचे मंत्री संदिपान भुमरे यांनी माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्याशी यावेळी मोबाईल वर चर्चा करुन सर्व मागण्यांबाबतची पूर्तता करणार असल्याचे सांगितले. तसेच मंत्रालयात तातडीने याबाबत १०० टक्के अनुकूल निर्णय घेऊन सर्व मागण्या पूर्ण करणार असल्याचे त्यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला व आ. काशिराम पावरा यांना मंत्री श्री. भुमरे यांनी आश्वासन दिले.
सदर विषयाबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Tags
news
