धुळे, दि. 11
(जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूची
रुग्ण संख्या नियंत्रणात असली, तरी तो पूर्णपणे आटोक्यात आणावयाचा आहे. त्यासाठी 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी'
मोहीम उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या मोहिमेच्या
माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास
व विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
पालकमंत्री श्री. सत्तार
आजपासून धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी शिरपूर येथील
नगरपालिका सभागृहात 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी',
महाराजस्व अभियान, सततच्या पावसामुळे झालेल्या
पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित तालुकास्तरीय बैठकीच्या वेळी ते बोलत
होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप
जगदाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी
डॉ. संतोष नवले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे आदी उपस्थित होते
यावेळी 'माझे
कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेचे किट वितरण,
कोरोना कालावधीत उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल माजी सैनिक, आशा स्वयंसेविका यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय
अर्थ साहाय्य योजना लाभार्थ्यांना धनादेश वितरण, महाराजस्व अभियानातंर्गत
विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या
हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री श्री. सत्तार
म्हणाले, की शिरपूर तालुक्यात आरोग्य विभागाने कोरोना विषाणू
नियंत्रणासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आता तो पूर्णपणे
आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेत को- मॉरबिड
रुग्णांच्या संपर्कात राहावे. त्यांच्या आरोग्याचा मोबाईल द्वारे
वेळोवेळी आढावा घ्यावा. अति जोखमीच्या रुग्णांची काळजी घ्यावी.
राज्य शासनाच्या
विविध योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी करीत सर्व सामान्य जनतेला दिलासा द्यावा. शेतकऱ्यांना
मदत करण्याचीच राज्य शासनाची भूमिका आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या
नुकसनीचे पंचनामे करून अहवाल सादर करावा. प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना
लाभ मिळावा. फळ पीक विमा योजनेत पपई पिकाच्या समावेश करण्यासाठी कृषी विभागाने
प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी
दिले. तसेच उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती कक्ष तयार करून अहवाल
सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा
परिषद अध्यक्ष डॉ. रंधे, आमदार श्री.
पावरा यांनी विविध सूचना केल्या.
उपविभागीय अधिकारी
डॉ. बांदल यांनी महाराजस्व अभियान, कोरोना विषाणू प्रतिबंध
साठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी शिरपूर तालुक्यातील कृषी विषयक
माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागूल
यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची सविस्तर माहिती दिली. या वेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित
होते.
पीक नुकसानीची
पाहणी
पालकमंत्री श्री. सत्तार
यांनी शिरपूर तालुक्यातील पिंप्री शिवारात केळी पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी
केली.
