आर. सी. पटेल अभियांत्रिकीचा इस्रोच्या आय. आय. आर. एस. आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत सामंजस्य करारात सहभाग




शिरपूर : येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय सातत्याने विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानातील आधुनिक संकल्पनांची ओळख करवून देण्यासाठी आणि संशोधनात्मक वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी अनेक सुविख्यात संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. नुकतेच महाविद्यालयाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (आय. आय. आर. एस. - इस्रो) सोबत सामंजस्य करार करून संशोधनात्मक चर्चासत्र व सादरीकरण ए-व्ह्यू सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मद्वारे यशस्वीरीत्या संपन्न होत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

सध्याच्या काळात रिमोट सेन्सिंग आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे, यामुळे या विषयाशी संबंधित प्रशिक्षित मनुष्यबळाची तातडीची मागणी निर्माण होत आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ, संशोधक–विद्यार्थी आणि इतर तज्ञ मंडळी यांना एकत्रित करून त्यांच्याकडील रिमोट सेन्सिंग, भौगोलिक माहिती प्रणाली, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आणि संबंधित, नवकल्पना व ज्ञानाची देवाण घेवाण व्हावी या उद्देशाने तसेच अभियांत्रिकीतील निरनिराळ्या विषयांवर संशोधनात्मक चर्चासत्र  व सादरीकरण घडवून आणणे आवश्यक होते.
यासाठी शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे प्रा. हेमराज  कुमावत यांना आय.आय.आर.एस. आऊटरीच प्रोग्राम समन्वयक म्हणून नेमले. या कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे लाइव्ह अँड इंटरएक्टिव्ह मोड आणि ई-लर्निंग मोड या दोन वितरण प्रणाली विकसित केल्या आहेत. मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारच्या सहकार्याने अमृता ई-लर्निंग प्रयोगशाळेने विकसित केलेल्या इंटरनेट आणि ए-व्ह्यू सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मद्वारे दूरस्थ शिक्षणाचे थेट आणि संवादात्मक कार्यपद्धती सक्षम केले आहे. 
आय.आय.आर.एस.-इस्रो मधील तज्ञांकडून थेट आणि संवादात्मक सत्रे घेतली जातात. अभियांत्रिकी महाविद्यालयाने लॉकडाउन च्या काळात आतापर्यंत २२ कार्यशाळांचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे, ज्यामध्ये ६०० हून अधिक विद्यार्थी तसेच सर्व विद्याशाखेतील प्राध्यापक वर्गाने देखील सक्रीय सहभाग नोंदवला. महाविद्यालयाने विद्यार्थीना त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीच्या फायद्यासाठी रिमोट सेन्सिंग आणि जिओइनफॉरमेशन सायन्स शिकण्याची संधी प्रदान करण्याचा प्रयत्न केला. रिमोट सेन्सिंग अँड जिओनफॉरमेशन सायन्सचा हा मूलभूत अभ्यासक्रम पदवी स्तरावर स्वतंत्र अभ्यास आणि प्रकल्प अनुभवासह आर. एस. आणि जी.आय.एस. तंत्रज्ञानामध्ये त्यांचे ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य तयार करण्यास संधी प्राप्त करून देतो. विद्यार्थ्यांनी स्वतंत्र पद्धतीने संशोधन करण्यासाठी तसेच समस्यांचे विश्लेषण करून त्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्याकरीता सदर उपक्रम वनीकरण, खाण, जलसंपदा आणि पर्यावरणीय विश्लेषणात तसेच पायाभूत सुविधांमध्ये अधिक फायदेशीर ठरला आहे.

या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रशांत महाजन आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.

---------

सर्व क्षेत्रांत आर.एस. आणि जी.आय.एस. च्या वाढत्या वापरामुळे निर्माण झालेली प्रशिक्षित मनुष्यबळाची तातडीची मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले संबंधित विषयाचे ज्ञान आणि कौशल्य प्रभावीपणे अवगत करून देण्यासाठी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय विशेष प्रयत्न करत आहे. याचेच फलित म्हणून ६०० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी आर.एस. आणि जी.आय.एस. तंत्रज्ञानातील संशोधनात्मक कौशल्ये विकसित करवून घेण्यासाठी आय. आय आर. एस. आऊटरीच प्रोग्राम द्वारे आयोजित सर्व कार्याशाळांमध्ये सक्रीय सहभाग घेतला.
: प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने