नंदुरबार :- कोरोना आजाराने गेले सहा महिने जनजीवन प्रभावीत केले आहे. केवळ शहरच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अनेक गावांनी स्वयंशिस्त पाळून कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळविले आहे. तरीदेखील काही गावात बाधितांची संख्या वाढते आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत आरोग्य तपासणीसोबत स्वॅब चाचणीचे प्रमाणही वाढविले. त्यामुळे संसर्ग वेळीच लक्षात येऊन उपचार करण्यात येत आहेत आणि बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अद्यापही धोका पूर्णपणे टळला नाही. कोरोनावर लस येईपर्यंत या आजारासोबत जगण्याची सवय करून घ्यावी लागेल. मात्र त्यासाठी खबरदारीच्या उपययोजनांवर भर द्यावा लागेल. एकाने किंवा एका कुटुंबाने खबरदारी घेऊन चालणार नाही, तर प्रत्येकाचा यात सहभाग आवश्यक असणार आहे.
गावातील जनजीवन सामान्य होत असताना गावातील नागरिकांमध्ये या आजाराबाबत अधिक जागृती घडवून आणणे, त्यांच्यापर्यंत खबरदारीच्या सूचना पोहोचविणे आवश्यक आहे.
● गावामध्ये/वसाहतींमध्ये वावरतांना प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे.
● घराबाहेर पडतांना प्रत्येकाने सॅनिटायझर, मास्कचा योग्यरित्या वापर करुन बाहेर पडावे. मास्क नसल्यास स्वच्छ कापड किंवा रुमालाने नाक व तोंड झाकावे.
● घरामधील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
● वसाहतींमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुट अंतर राखूनच संवाद साधवा.
● गावातील मंदिर, सार्वजनिक सभागृह, चावडी याठिकाणी लोकांनी एकत्र येणे टाळावे.
● दरवाजाचे कडीकोयंडा, कठडे (हॅण्ड रेलिंग), बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्यतो टाळावे.
● गावातून/वसाहतीतून पुन्हा घरात येताच कुठेही स्पर्श न करता सर्वात आधी सॅनिटायझरने किंवा साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
● बाहेर फिरतांना उघड्यावर थुंकू नये.
● घरातून बाहेर पडताना वाहनाना स्पर्श करण्यापूर्वी त्यांची निर्जुतुकीकरण करावे.
● नजीकचे सार्वजनिक आरोग्य केंद्र रुग्णालय, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष (वार्ड वॉर रुम) आदी महत्वाचे संपर्क क्रमांक ठळकपणे दिसतील अशारितीने परिसरात प्रदर्शीत करावे.
गावातील युवक, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन या सूचना घरोघरी पोहोचविल्यास कोरानावर बऱ्याचअंशी नियंत्रण मिळविता येईल. त्यासोबत आरोग्य तपासणीला सहकार्य करून, गावात बाधित व्यक्ती आढळल्यास इतरांची स्वॅब चाचणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करून या मोहिमेला गती देता येईल. गृह विलगीकरणात असलेली व्यक्ती निर्धारीत कालावधीत इतरांमध्ये मिसळणार नाही याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
◆◆ कोरोनाशी लढताना दक्षता महत्वाची आहे. संसर्ग वेळेतच रोखणे हे उपचारापेक्षाही महत्वाचे आहे. गावातील नागरिकांचे सामान्य जीवन चांगल्या पद्धतीने सुरू रहावे व अर्थकारणाला गती मिळावी यासाठी कोरोनाला गावातून हद्दपार करावेच लागेल आणि ग्रामस्थ एकत्र आल्यास हे सहज शक्य आहे.
-जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबार
Tags
news
