शिरपूर : येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रा. पायल हसमुखलाल पाटील यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कडून पीएच. डी प्रदान करण्यात आली.
त्यांनी आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे फार्मास्युटिक्स विभागप्रमुख प्रा. डॉ. हितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली “फॉर्मुलेशन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ पॉलीमेरिक मिसेल्स अॅज ड्रग डिलिव्हरी सिस्टिम फॉर ऍन्टिरेट्रोवायरल ड्रग” या विषयावर प्रबंध सादर केला व २ सप्टेंबर २०२० रोजी विद्यापीठ नियुक्त समितीसमोर प्रबंधाचे यशस्वीपणे सादरीकरण करून पीएच. डी. मिळवली.
सदर संशोधनात एचआयव्ही, एड्सच्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्या विविध औषधांचे नॅनोफॉर्मुलेशन विकसित करण्यात आले. या औषधांच्या निर्मितीमुळे रुग्णांवरील उपचार अधिक प्रभावी होऊन एचआयव्ही रूग्णांना देण्यात येणाऱ्या हायली एक्टिव्ह ऍन्टिरेट्रोवायरल थेरपी उपचारपद्धतीत येणाऱ्या विविध आव्हानांवर मात मिळवता येणार आहे. तसेच प्रा. पाटील यांनी विविध नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक संशोधन पत्रके प्रकाशित केली आहेत व २०१५, २०१७ आणि २०१८ मध्ये विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत संशोधन कार्यासाठी अनुक्रमे द्वितीय, प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला असून २०१७ ते २०१९ पर्यंत सलग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी पीएच. डी. विद्यार्थी गटातून अनुक्रमे राहुरी, गडचिरोली आणि मुंबई येथे प्रतिनिधित्व केले आहे. प्रा. पाटील या शिरपूर येथील कंत्राटदार कै. हसमुखलाल लखमीचंद पाटील (गुजराथी) यांच्या कन्या आहेत.
सदर यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, सर्व संचालक व प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी कौतुक केले.
Tags
news
