शिरपूर : पंतप्रधान फळपिक विमा योजना अंतर्गत केळी व पपई पिकांचा रोजगार हमी योजना व फलोत्पादन मध्ये समावेश करण्यात यावा अशा मागणीचे पत्र माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी रोजगार हमी, फलोत्पादन विभागाचे मंत्री संदिपान भुमरे यांना दिले असून त्याबाबत पाठपुरावा करीत आहेत.
रोजगार हमी व फलोत्पादन विभागाचे मंत्री संदिपान भुमरे यांना माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी पत्र दिले असून या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील इतर फळपिकांसाठी, रोप लागवडीसाठी, रोपांसाठी अनुदान खतांसाठी व मजुरीसाठी अनुदान देय आहे. रोपवाटिकेतून केळी व पपई चे रोप जास्त किमतीचे मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी तो खर्च न परवडणारा आहे. इतर फळपिकांच्या शासन निर्णयाच्या निकषाप्रमाणेच केळी व पपई या पिकांचा देखील समावेश व्हावा. शिरपूर तालुक्यात आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात असल्याने आदिवासी बांधवांना मिळालेल्या वनपट्टे जमिनीचा देखील या रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात यावा. अल्पभूधारक तसेच मोठ्या शेतकऱ्यांना देखील शासनाच्या या योजनेचा लाभ मिळावा असे माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी पत्रात म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी याबाबत माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांना निवेदन दिले होते.
Tags
news
