■■ लेख लेखन
■■"भिडेवाडा,पुणे 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित झालाच पाहिजे......!"
◆◆....काय आहे भिडेवाडा प्रश्न.?याविषयी माहिती जाणून घेऊयात..?
-'देशातील पहिली मुलींची शाळा कुठे आहे.?'असा प्रश्न सहज आपल्याला कुणी विचारला तर लगेच उत्तर देता येईल-"भिडेवाडा पुणे!"परन्तु पुण्यात आल्यावर 'भिडेवाडा कुठे आहे.? असं तुम्ही विचारलं तर रिक्षावाले काका काय साध्या ज्येष्ठ व्यक्तीलासुद्धा पुण्यात भिडेवाडा कुठे आहे हे सांगता येणार नाही.पण तुम्ही 'दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर कुठे आहे.?हे जर विचारलात तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल.कारण 'भिडेवाडा' ही देशातील पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेतील दगडूशेठ हलवाई मंदिराच्या बरोबर समोरच आहे. भारतीय वारसा स्थळांपैकी एक असलेल्या भिडेवाड्यावर साधा फलकसुद्धा लावण्यात आलेला नाही.अगदी तुम्ही भिडेवाडा समोरून चालत निघून गेलात तरी तो 'भिडेवाडा' आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही.कारण हाच भिडेवाडा आज शेवटचा घटका मोजत असून मोडकळीस आलेला आहे.भिडेवाड्याची साधी डागडुजी न होणे व राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित न होणे ही तमाम पुरोगामी देशवासियासाठी ही फार मोठी शोकांतिका आहे.
भारतातील ज्येष्ठ समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अनेक शाळा उघडल्या त्यापैकी दि.१४ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात 'भिडेवाडा'येथे पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती.फुलेंचे मित्र श्री.भिडे यांनी फुलेंना शाळा चालवण्यासाठी हा वाडा भाडेतत्वावर दिला होता.त्याकाळी मुलींच्या शिक्षणाला होणारा विरोध पत्करत फुलेंना तत्कालीन समाजाकडून होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले.परन्तु त्यांनी अजिबात डगमगता पत्नी सावित्रीबाई यांनी शिक्षित करून याच शाळेत शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी सोपवली. एक रुपयाही पगार न घेता मोफत ज्ञानदान करणाऱ्या देशातील पहिल्या मुख्यध्यापिका म्हणून सावित्रीबाईचे नाव आजही स्मरण केले जाते. परन्तु याच सावित्रीबाईच्या शाळेची आज दुरवस्था झाली असून शाळा मोडकळीस आली आहे तसेच 'भिडेवाडा' सध्या दारुड्याचा अड्डा बनलाय. या वाड्याची डागडुजी करून त्याला राष्ट्रीय वारसास्थळाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी तमाम जनतेकडून करण्यात येत आहे.
पुणे शहरातील शनिवारवाडा, लाल महाल परिसरात थोडं पुढे गेलो तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दिसते. या मंदिरासमोरच 'भिडेवाडा' इमारत उभी आहे.हे ठिकाण पुण्यातल्या गजबजलेल्या ठिकाणापैकी एक असून तिथे दिवसभर लाखो-हजारो लोकांची वर्दळ असते. पुस्तके, धार्मिक साहित्य, कपडे, मनोरंजनसाहित्याची दुकाने त्याचबरोवर दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शन करणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असल्याने व्यावसायिकदृष्ट्या या जागेला प्रचंड महत्व आहे. एक-एका दुकानाची दिवसभराची उलाढाल ही लाख रुपयांवर आहे. अशा गजबजलेल्या ठिकाणी भिडेवाडा असल्याने भिडेवाड्याच्या पायथ्याशी एकूण 'सहा' दुकाने ही विविध व्यावसायिकांनी थाटली आहेत. भिडेवाडा स्मारक घोषित करण्यासाठी मात्र हीच दुकाने प्रमुख अडथळा ठरत आहेत. कारण या दुकानांची दिवसभरची उलाढाल ही लाखो रुपयाची असल्याने तेथून उठण्यास हे दुकानदार तयार नाहीत. कारण तेथून त्यांना उठवल्यास आजच त्यांच्या रोजी रोटीवर गदा येईल. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. परन्तु पुनर्वसन करतांना त्याच दर्जाच्या जागेवर पुनर्वसन केले जाऊन नुकसान भरपाई म्हणून शासनाने प्रत्येक दुकानदाराला चार-पाच कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी त्या दुकानदारांची मागणी आहे. परन्तु शासकीय दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई देणे शक्य नाही. त्यामुळे ह्याच दुकानदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून भिडेवाडा प्रश्न सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. भिडेवाडयाच्या कायदेशीर दस्तऐवज न्यायालयात सादर करणेकामी राज्य सरकार कमी पडत असल्याने दिवसेदिवस हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे . त्यामुळे भिडेवाड्याची अवस्था आणखीच गंभीर बनत असून भिडेवाडा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र तत्पूर्वीच मार्ग काढणे आवश्यक असून 'भिडेवाडा बचाव मोहिमेमार्फत मोर्चे, आंदोलने याद्वारा शासनाचे लक्ष वेधले जात आहे.
गेल्या एक दशकांपूर्वी आरपीआय चे कार्यकर्त् परशुराम वाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावे म्हणून आंदोलन छेडले होते. त्याचवेळी 'देशातील पहिली मुलींची शाळा' असा फलक लावून भिडेवाड्याची ओळख करून देण्यात आली. तद्नंतर माजी आमदार कमलताई ढोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली गेली. त्यांनंतर नागपूर येथील नगरसेवक अविनाश ठाकरे हे देखील सलग पाच वर्षपासून १ जानेवारी ला आंदोलन करीत आहेत. तसेच आमचे औरंगाबाद येथील मित्र कल्याण जाधव, अमर हजारे यांनी गेल्या वर्षी राज्यभर आंदोलन केले. म्हणून यावेळी कुठेतरी पुणे महानगरपालिका भिडेवाडा डागडुजीसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात एक कोटी रुपये तरतूद करते. परन्तु प्रकरण न्यायालायत प्रलंबित असल्याने हा निधी खर्च न करता तसाच वाया जातो. भिडेवाडा प्रश्न दिवसेंदिवस पेटत असल्याने तरुण युवक प्रशांत फुले, औरंगाबादचे कल्याण जाधव, स्वातीताई मोराळे यांनी कायदेशीर मार्गाने लढा उभारला. माहिती अधिकार, शासनाशी पत्रव्यवहार करून दाद मागितली. परन्तु शासनाकडून थातूरमातूर उत्तरे मिळत गेली. लोकप्रतिनिधी, तत्कालिक आमदार, मंत्री यांनी निव्वळ आश्वासने देऊन वेळ मारून नेली. त्यामुळे भिडेवाडा प्रश्न जास्तच चिघळला असून निवडणुकीपूर्वी हा प्रश्न मिटायला हवा.
सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारने तत्काळ विशेष वकीलांची नेमणुक करून भीडेवाडा प्रकरणाला न्याय मिळवून द्यावा. स्थानिक दुकानदार व्यावसायिक यांच्या मागणीचाही प्राधान्याने विचार होऊन शासनाने भिड़ेवाडा पुनर्जीवित करण्यासाठी निधीची तरतूद करावी. केंद्र सरकारने समस्त फुलप्रेमीच्या भावनाची दखल घेऊन लवकरात लवकर 'भिड़ेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे'ही विनंती.
◆◆प्रवीण महाजन,पुणे
(रा.कोठली ता.शहादा जि. नंदुरबार)
www.yuvakmitra.org
Tags
news
