धुळे, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. धुळे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. यादव
यांनी म्हटले आहे, भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर
(Qualifying Date) आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण
कार्यक्रम घोषित केला आहे. 25 जोनवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन
साजरा केला जातो. तत्पूर्वी मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द
करावी, अशा पध्दतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. जेणेकरुन मतदार यादीत 18 ते 19 वर्षे वयोगटातील नवीन नोंदणी झालेल्या मतदारांच्या
छायाचित्र मतदार ओळखपत्राची छपाई करुन त्यांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी मतदार
ओळखपत्रांचे वितरण करता येईल.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम असा : मतदान केंद्राचे
सूसुत्रीकरण व प्रमाणिकरण करणे, दुबार- समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्र
संदर्भातील त्रुटी दूर करणे, विभाग, भाग
पुन्हा तयार करणे आणि मतदानाच्या क्षेत्राच्या, भागांच्या सीमेच्या
पुनर्रचनेचे प्रस्ताव अंतिम करणे आणि मतदान केंद्रांची यादी मंजूर करणे- 30
सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2020. नमुना एक ते आठ तयार करणे, पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारुप
यादी तयार करणे- एक ते 15 नोव्हेंबर
2020. एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे- 16 नोव्हेंबर 2020. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी-
16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020. विशेष मोहिमेचे दिनांक- दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधीत
मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र
राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार. दावे व हरकती
निकाली काढणे- 5 जानेवारी 2021. प्रारुप
मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे, मतदार यादीच्या अंतिम
प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे. डेटाबेसचे अद्ययावतीकरण
करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे- 14 जानेवारी
2021. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी- 15 जानेवारी
2021.
धुळे जिल्ह्यातील
मतदारांचे मतदार यादीमधील नाव, नातेवाईकाचे नाव
व प्रकार, लिंग, वय, जन्म
दिनांक व
पत्ता आदी माहितीची दुरुस्ती किंवा बदल करावयाचा असेल त्यांनी दुरुस्तीकरीता आवश्यक
असलेली कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना उपलब्ध
करुन द्यावीत. दुरुस्तीचा अर्ज क्रमांक 8 भरुन आवश्यक ते बदल करुन घ्यावेत.
जिल्ह्यातील
ज्या पात्र नागरिकांची अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, असे
वंचित नागरिक व नवमतदारांनी आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करुन नावाची नोंदणी
करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरुन द्यावेत. मतदारांच्या माहितीसाठी
धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे नाव,
मतदान केंद्र आणि संपर्क क्रमांक असलेली विधानसभा मतदार संघनिहाय यादी
जिल्हा प्रशासनाच्या www.dhule.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील
सर्व मतदार, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संघटनांनी
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मतदार यादी अद्ययावतीकरणाच्या मोहिमेस सहाकर्य करावे,
असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले
आहे.
