क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या : अन्न पुरवठा व नागरी संरक्षण मंत्री छगन भुजबळ अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांचा केला सत्कार




               नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून .
नाशिक -: अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तू भोकनळ यांनी अशीच प्रगती करत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे; अशा शब्दात अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार केला.

विधानभवन येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंत्री श्री.भुजबळ बोलत होते. पुढे बोलताना श्री भुजबळ म्हणाले, नाशिकच्या चांदवड तालुक्यात दत्तू भोकनळ यांनी अत्यंत गरीबीत शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असताना सैन्यदलात दाखल झाले आणि तिथे नौकानयनचे धडे गिरवून अवघ्या 3 ते 4 वर्षात ऑलिम्पिकमध्ये धडक मारली. त्यानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि आता केंद्र शासनाचा मानाचा असा अर्जुन पुरस्कार मिळविला. दत्तू भोकनळ यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला तुम्ही सुवर्णपदक मिळवून द्याल त्यासाठी संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांनी सत्काराला उत्तर देताना, आई, वडील आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळत असते. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा प्रयत्न करेल.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने