मानवी जीवनाला सुयोग्य आकार देण्यात आई वडिलांसह शिक्षकांचे योगदानही महत्वाचे असते.पालकांनी आपल्या पाल्यांना संस्कार क्षम करावं, तर शिक्षकांनी त्यांना आदर्श नागरिक बनविण्याच्यादृष्टीने विद्यादान करावं, म्हणजे भावी पिढी बुध्दीमान अन् राष्ट्रप्रेमी होऊन देशाचे नाव विश्वात अजरामर करेल,हे निश्चित.आज देशात मोठ मोठे शास्त्रज्ञ,विचारवंत, कायदेपंडित,डॉक्टर,,
राजनेता,साहित्यिक,अभिनेता,चित्रकार,समाजसेवक, इंजिनियर, सनदी अधिकारी, आय पी एस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत,त्या सर्व घटकांच्या जडण घडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. एका शिक्षकात एवढी प्रचंड प्रमाणात बुद्धिमत्ता असते की,तो बुद्धिमत्तेच्या बळावर देशातल्या *राष्ट्रपती*या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकतो.त्याचे उदाहरण म्हणजे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन होय.'राष्ट्रशिक्षक' अन् भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्म दिवस देशात 'शिक्षक दिन' म्हणून भारत सरकारतर्फे साजरा केला जातो.या पार्श्वभूमीवर डॉ.राधाकृष्णन यांना भावपूर्ण आदरांजली आणि तमाम शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
'शिक्षण अन् तत्वज्ञान' या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल राधाकृष्णन यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करून केंद्र सरकारतर्फे सन्मानित करण्यात आले. "शिक्षकांनी शुद्धविचार, चारित्र्यसंपन्नता ,संयमशिलता,निर्भयता व सदाचार या पंचसूत्रांची कास धरून विद्यार्जनाचे उत्तर दायित्व पार पाडावे"असा मोलाचा संदेश राधाकृष्णन यांनी अध्यापकांना दिला आहे.आचारविचारांना आत्मसात करून विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा,हा त्यामागील राधाकृष्णन यांचा मूळ उद्देश होता.अशा महान राष्ट्रशिक्षकाला आमचे शतशः प्रणाम.
शिक्षकांनी या पंच सूत्रांचा अंगीकार करून तन मन धनाने आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याला सुयोग्य आकार द्यावा. भारताची भावी पिढी सर्वदृष्टीने सक्षम व बुध्दिमान व्हावी,यासाठी सरकारने शिक्षकांना शैक्षणिक कामा व्यतिरिक्त दुसरी 'अशैक्षणिक कामे' (उदा. जनगणना,निवडणुकींची कामे आदी)देऊ नये,जेणेकरून 'ते' विद्यार्जनाचे कार्य पुर्णक्षमतेने करू शकतील.
आजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असल्याने शिक्षक वर्गाला माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे,याचा विचार करून केंद्र व राज्य सरकारने त्या दिशेने ठोस पावलं उचलावीत.सदर शिक्षण पद्धतीचे लोण खेडोपाडी पोहोचविण्यासाठी शासन यंत्रणेने प्राधान्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी आय. टी.शिक्षणात मागे पडणार नाहीत.यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी. समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर प्रामाणिक प्रयत्न व्हावेत,त्यातून शहरी भागासह ग्रामीण भागातही साक्षरतेची प्रमाण वाढू शकेल.
शिक्षणाचे व्यापारीकरण थांबविण्यासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां च्या पाल्यांना उच्च शिक्षणाचा लाभ घेता यावा,यासाठी 'डोनेशन' देण्या-घेण्यावर कडक निर्बंध असावेत.शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त कामांचा बोझा पडू नये,याकरिता त्या त्या ठिकाणी पुरेश्या प्रमाणात शिक्षक संख्याबळ असावे.विद्यार्थ्यांना आदर्श व संस्कारक्षम करावयाची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यांवर असते,याचा विचार करून शिक्षकांनी तंबाखू सेवन, धुम्रपान, मद्यपान या व्यसनांपासून कोसो दूर रहावे,कारण 'मुलं' ही अनुकरणप्रिय असतात,हे अध्यापकांनी लक्षात ठेवावे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासह पर्यावरण,वृक्षारोपण तसेच प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम,जल-वायू-ध्वनी प्रदुषण होऊ नये यासाठी काय दक्षता बाळगावी,प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी,घनकचराचे वर्गीकरण व त्यापासून सेंद्रिय खतांची निर्मिती,श्रमदान,व्यायाम व योगाभ्यासाचे फायदे आदी गोष्टींचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवावे,जेणेकरून हीच मुलं-मुली पुढे मोठी झाल्यावर पर्यावरणप्रेमी,निसर्गप्रेमी होऊन वसुंधरेचं(पृथ्वीचं) रक्षण व संवर्धन करण्याच्या कामी स्वेच्छेने योगदान देण्यास पुढे येतील.तात्पर्य,शिक्षक दिनी ह्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकून,अध्यापक वर्गाला सचेत व सावध करणं अगत्याचे आहे.
आज साऱ्या जगाला कोरोना महामारीने ग्रासले असून,त्याचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर करून शाळा महाविद्यालये बेमुदत बंद ठेवली आहेत.परिणामी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खोळंबा होत आहे.सरकारने त्यावर उपाय म्हणून 'ऑनलाईन एज्युकेशन'ही नवीन शिक्षण प्रणाली लागू केली आहे.परंतु त्यामुळे पालकांना शिक्षण शुल्कासह लेप टॉप,मोबाईल ही उपकरणे विकत घ्यावी लागत असल्याने त्यांच्यावरील खर्चाचा बोजा दुपटीने वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात वाढता शैक्षणिक खर्च भागविणे पालकांना नाकेनऊ येत आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू झाल्याने शिक्षकांनाही यासंबंधी प्रशिक्षण घ्यावे लागत आहे.तथापि,ग्रामीण भागात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने,तेथील विद्यार्थी व शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.यास्तव शिक्षक वर्गाला विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.कुठ्ल्याही परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारला शहरी भागातील विद्यार्थ्यासह ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे,हाच एकमेव पर्याय आहे.मित्रहो, भारतासह राज्यातील शिक्षक वर्ग कुठ्ल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे,त्यामुळे पालकांना काळजी करण्याचे कारण नाही.8) बंधू भगिनींनो,शिक्षक दिनी डॉ.राधाकृष्णन यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,लोकमान्य टिळक, साने गुरुजी,रवींद्रनाथ टागोर,धोंडो केशव कर्वे आदी थोर शिक्षकांचे स्मरण करणे अगत्याचे आहे.कारण ह्या शिक्षणमहर्षींनी देखील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे."दर्जेदार शिक्षण देणारा देश,अशी जगात भारताची प्रतिमा असावी"हे डॉ.राधाकृष्णन यांचे स्वप्न साकार करणे,म्हणजे हीच खरी शिक्षक दिन साजरा करण्याची फलश्रुती ठरेल."विद्या विनयेन शोभते"
- लेखक:- रणवीर राजपूत
(गवर्नमेंट मिडिया,म.शा.),ठाणे प.
9920674219.
Tags
news

