शहादा : शहरातील जुन्या बसस्थानकातून बुधवार २३ सप्टेंबर पासून बसेस पूर्ववत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याने प्रवासी वर्गातून त्याचे स्वागत होत आहे . कोरोनाच्या खबरदारीचा उपाय म्हणून , आतापर्यंत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार शहादा एसटी आगारातील बस वाहतूक शहराबाहेरील नवीन बसस्थानकातून सुरु होती . मात्र ही पर्यायी व्यवस्था शहादा शहर आणि परिसरातील प्रवासी वर्गासाठी अत्यंत गैरसोयीची आणि खर्चिक असल्याकारणाने नागरीकांमध्ये संतोष निर्माण झाला होता . शिव रात्री -- बेरात्री प्रवासी आले तर असुरक्षतेची भावनाही वाढलेली होती . शहादा आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत यांनी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांना विनंती अर्ज पाठवन शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून बसेस सुरु करण्याची परवानगी मागितली होती . त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून नेहमीच्या बसस्थानकातून बसेस सोडण्यास परवानगी दिली आहे . कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी दक्षता म्हणून शहराबाहेरील बसस्थानकातून एसटी बसेस सुरू करण्याचा आदेश दिलेला होता . यासंदर्भात प्रवासीवर्गात प्रचंड नाराजी होती . दरम्यान नागरिक व प्रवाशांच्या गैरसोयींबद्दल विविध वर्तमानपत्रातून वृत्त प्रसिद्ध झाले होते . तसेच एसटी आगाराच्याही उत्पन्नावर परिणाम झालेला होता . आता जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्याने हरातील नेहमीच्या बसस्थानकातून सर्व बसेस सुटणार आहेत . या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे एस.टी. अधिकारी , कर्मचारी व शहादा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रा.दत्ता वाघ यांनी स्वागत केले .
Tags
news

