-ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब रुग्णांचे देवदूत, जागतिक ग्रामीण शल्यचिकित्सक,अंतरराष्ट्रीय संशोधक,हजारो कुटुंबाचे अपत्यप्राप्तीचे स्वप्न यशस्वी उपचारपद्धतीद्वारा पूर्ण करणारे तज्ञ डॉ.रविंद्रनाथ टोंणगावकर उर्फ नानासाहेब रा.दोंडाईचा जि.धुळे यांचे आज अल्पशा आजाराने नाशिक येथे निधन झाले.दि.१७ नोव्हेंबर १९३९ ते दि.७ सप्टेंबर २०२० पर्यंतचा तब्बल ८१ वर्षाचा प्रवास आज अचानक थांबल्याने संपूर्ण खान्देश आज शोकसागरात बुडालेला आहे.हजारो गोरगरीब रुग्ण एका देवमाणसाला गमावल्यामुळे पोरके झाले आहेत.
मोठया शहरात डॉक्टरकी करून पैसे कमवायची एखाद्या डॉक्टरची इच्छा असेल, तर त्यात वेगळे काही नाही;पण एखाद्या तज्ञ डॉक्टरला पैशापेक्षाही ग्रामीण भागात राहून रुग्णसेवा करणे महत्वाचे वाटत असेल तर ती नक्कीच आश्चर्याची आणि त्यापेक्षाही आदराची गोष्ट ठरते.डॉ.रवींद्रनाथ टोणगाववकर रा.दोंडाईचा हेसुद्धा त्यापैकीच एक..! पुण्यातील बी.जे.मेडिकल कॉलेज,ससून रुग्णालयासारख्या नामांकित कॉलेजला जून१९५८ साली वैद्यकीय शिक्षणाला प्रारंभ झाला.परंतु वडिलांच्या विंनतीस मान देऊन आदिवासीबहुल ग्रामीण भागातील दोंडाईचा येथे वैद्यकीय सेवेस सुरवात झाली.कधीही विश्रांती न घेता आयुष्याची तब्बल पंचावन्न वर्ष वैद्यकीय सेवेत देणाऱ्या नानांसाहेबांना लॉकडाऊन कालावधीत एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला.भारतीय स्वातंत्र्यचळवळीत असलेला वडिलांचा वारसा,गांधीजीची शिकवण आणि गांधीवादी विचार,वैद्यकीय क्षेत्रातील आंतराष्ट्रीय संशोधन अशा अनेक गोष्टी चर्चेतून जाणून घेण्यात यशस्वी झालो.
वैद्यकीय परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक असलेल्या वडिलांचा शब्द पाळावा,शेवटपर्यन्त गांधीवादी विचाराचा प्रचार प्रसार करावा,गोरगरिबांची सेवा करता यावी यासाठी नानासाहेबांनी तत्कालीन धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहराची आरोग्यसेवेसाठी निवड केली.नानासाहेबाचे वडील अण्णासाहेब टोणंगावकर महात्मा गांधींचे निष्ठावंत कार्यकर्त होते.तळागाळातील अस्पृश्य समाजाच्या उध्दारासाठी महात्मा गांधींनी 'हरिजन सेवक संघाची' स्थापना केली होती.या संघाचे अण्णासाहेब मानद सचिव होते.याच अण्णासाहेबांना दि.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला त्यादिवशी ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून तिरंगा ध्वज फडकविण्याचा मान मिळाला होता.यावेळी अण्णासाहेबांनी 'जगेल तर देशासाठी..मरेल तर गोरगरिबांच्या सेवेसाठी'ही शपथ घेतली.माझ्या जाण्यानंतर माझ्या मुलानेसुद्धा ही शपथ सार्थ करावी अशी अण्णाची इच्छा होती. ही इच्छा मी आणि माझी पत्नी डॉ.आशा पूर्ण करतोय असे डॉ.नानासाहेब सांगत.
वैवाहिक जीवनात अनेक दिवस अपत्यप्राप्तीचे सुख न मिळवु शकणाऱ्या असंख्य कुटूंबाना यशस्वी वैद्यकीय उपचाराने मातृत्वाचा आणि पितृत्वाचा हक्क मिळवून देण्याचे कार्य नानांनी केले आहे.आजही अनेक महिला व पुरुष नानाच्या हॉस्पिटलसमोरून जातांना हॉस्पिटलला नमस्कार करतानां मी पाहिले आहेत. खांदेशसह विदर्भ,मराठवाडा भागातून असंख्य रुग्ण पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभे असतात.सकाळी ८ वाजेपासून रात्री १.०० वाजेपर्यंत नानासाहेब न थकता रुग्णांना सेवा देत असत.नुसतच वैद्यकीय औषधोपचार नाही तर गोरगरिबांना परवडेल अशा कमी खर्चात शस्त्रक्रियासुद्धा नानांनी यशस्वी पार पाडलेल्या आहेत. म्हणून ग्रामीण,दुर्गम भागातील अर्थिकदृष्ट्या गरीब रुग्ण कुठलीही चिंता न बाळगता हॉस्पिटलला येत असत.कमकुवत आर्थिक परीस्थिती असणाऱ्या अनेक रुग्णाकडून नानानी उपचाराचे बिलसुद्धा घेतलेलं नाही.
दैनंदिन कार्यातून मिळेल तो वेळ काढून नानांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.समाजाचे आपण देणं लागतो!गोर गरिबासाठी आपल्या उत्पन्नाचा हिस्सा खर्च केला पाहिजे या विचारातून नांनानीं दोंडाईचा शहरात 'रोटरी क्लबची'स्थापना केली.व रोटरिद्वारा ग्रामीण भागात असंख्य जनहिताचे उपक्रम राबविले.तसेच अनेक सामाजिक संस्थांना,गोरगरीब रुग्णांना त्यांनी आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे.
नानाच्या सामाजिक सेवेबरोवरच वैद्यकीय सेवेबद्दल लिहायचे झाले ते कमी पडेल. सत्तरच्या दशकांत वैद्यकीय क्षेत्र प्रगतीवर असतांना ग्रामीण दुर्गम भागात अंधश्रद्धा डोके वर काढीत होती.अशा वेळी नानांनी ग्रामीण दुर्गम भागात पायपीट करत जनतेला अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे देण्याचे कार्य केले.नंतर राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाल्यानंतर नानांनी वरिष्ठ पद मिळत असतांना धुळे जिल्हाध्यक्ष पद स्वतःहून घेतले.नंतर ते राज्य उपाध्यक्ष झाले.फसव्या उपचारपद्धतीबद्दल अंनिसच्या व्यासपीठावरून त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.जागतिक ग्रामीण वैद्यकीय परिषदेचे अध्यक्षपद दोंडाईच्यासारख्या ग्रामीण भागातील डॉक्टराला मिळावे ही नानांच्याच नव्हे तर समस्त भारत देशवासीयांच्या दृष्टीने अभिनंदनाची गोष्ट होती.तत्कालीन महाराष्ट्र सरकारने नानांच्या कार्याची दखल घेत वैद्यकीय क्षेत्रातील मानाचा डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्कार देऊन गौरव केला.
वैद्यकीय क्षेत्रातल्या बुद्धीप्रामाण्यतेवर भर देत नानासाहेबांनी देव,दैव,अध्यत्म यांचाही शोध घेतला.उपनिषदापासून शस्त्रक्रियेपर्यत अनेक विषयांवर राष्ट्रीय,अंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये व्याख्याने दिली.ग्रामीण भागातल्या अंधश्रद्धानां दूर करण्याचा प्रयत्न करत शास्त्रीय तत्वावर विश्वास ठेवुन जगण्याचा मार्ग दाखवला.नानासाहेबांनी हर्नियाच्या ऑपरेशनसाठी आयात केल्या जाणाऱ्या महागड्या जाळीच्या कापडासंदर्भात तब्बल बारा वर्षे संशोधन केले. याच संशोधनातून फक्त पन्नास पैशापासून ते दोन रुपयापर्यंत किमतीची जाळी शोधली.आज जगभरातील अठ्ठावीस देश या जाळीचा वापर करत आहेत.या शोधकार्याची कतारमधील दोहा येथील जागतिक परिषदेत प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. व डॉ.नानानां गौरविण्यात आले.इंग्लडमधील आंतरराष्ट्रीय हर्निया सोसायटीचे प्रमुख डॉ.किंग्जनॉर्थ हे या संशोधनाचा आजही जगभर प्रचार प्रसार करत आहेत.जागतिक वैद्यकीय शास्त्रात नानांच्या शोधकार्याचे मोल फार मोठं आहे.
अखंड मानवजातीला अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व आपल्यातुन आज निघून गेले आहे ही बातमी ऐकल्यानंतर हजारो बरे झालेल्या रुग्णांचे डोळे पाण्यावल्याशिवाय राहणार नाहीत.अनेकांनी घरचा माणूस गेला म्हणून दुखवटा पाळलेला आहे.आज संपूर्ण खान्देश शोकसागरात बुडालेला असून नानांची हजारो वर्षे उणीव भासत राहील.आपल्या जगण्याने समाजाला माणुसकीचा वस्तुपाठ शिकविणाऱ्या नानांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
-प्रवीण महाजन,पुणे
(रा.कोठली ता.शहादा)
www.yuvakmitra.org
Email-pravinpune123@gmail.com
Tags
news
