शिरपूर - शिरपूर तालुक्यात डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये झालेल्या नुकसानीची तसेच ऑगस्ट २०२० मध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी भाजप च्या वतीने जिल्हाधिकारी यांना आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दि. १० सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी दिली आहे.
शासन आदेशानुसार डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये झालेल्या नुकसानीची महाराष्ट्रातील फक्त सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गारपीट, वादळी वाऱ्यामुळे नुकसान ग्रस्त सात जिल्ह्यांना ९३ कोटी रुपये शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र यात धुळे जिल्हा वगळून निधी वितरित करण्यात आला आहे.
माहे ऑगस्ट २०२० मधील सतत पडणाऱ्या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन हे कडधान्य वर्गीय पिकांचे फुटवे फुटून नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त असंख्य शेतकरी बांधव यांना न्याय मिळावा व त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे १ सप्टेंबर २०२० रोजी सादर करण्यात आला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले होते. तसेच कीड रोगांमुळे मूग, उडीद, सोयाबीन इ. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी आयुक्तालय यांनी जिल्हा कृषी अधिकारी धुळे यांना दि. २६ ऑगस्ट २०२० च्या पत्र नुसार अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिरपूर तालुक्यात मार्च २०२० मध्ये सुद्धा गारपीट, वादळी वारा व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. याबाबत पंचनामे करून तसा अहवाल माहिती तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या संयुक्तपणे केलेले पंचनामे, संपूर्ण अहवाल शासनास सादर केला असून धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात अतोनात नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पुरावे सादर केले होते. यावेळी दोन दिवस गारांचा खच रस्त्यावर पडलेला होता, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती, इलेक्ट्रिक तारा तुटून तीन दिवस वीज प्रवाह खंडित होता, शेतीमाल, शेड नेट आदि अनेक बाबींचे नैसर्गिक संकटामुळे नुकसान झाले होते.
याच कालावधीत झालेल्या नुकसान बाबत शासन आदेशानुसार नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गारपीट, वादळी वाऱ्यामुळे इतर सात जिल्ह्यांना ९३ कोटी रुपये शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र यात धुळे जिल्हा वगळून निधी वितरित करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील नुकसानीचे आकडेवारी, अहवालाच्या सत्यप्रती समोर असून देखील हेतू पुरस्करपणे धुळे जिल्हा तसेच शिरपूर तालुक्याला वगळण्यात आल्याचे लक्षात येत आहे. शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी जिल्हाधिकारी यांंची गुरुवारी दि. १० सप्टेंबर रोजी भेट घेणार आहेत. शिरपूरचा शेतकरी हा महाराष्ट्राचा नागरिक नाही का, राजकीय द्वेषापोटी शिरपूरचे आमदार विरोधी पक्षाचे असल्यामुळे शिरपूर तालुक्यातील नुकसान ग्रस्तांना वेठीस धरण्यात आले असल्याचे लक्षात येत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनात शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध केला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र सरकार विरोधी आमदारांच्या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधव यांना वगळण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या व नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या मागणीसाठी कोरोनाच्या काळात सुद्धा कोर्ट मार्शल प्रमाणे मागणीच्या कागदपत्रांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे.
शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना न्याय मिळण्यासाठी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकसान ग्रस्त शेतकरी बांधव, भाजपाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तसेच नुकसानग्रस्तांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी कळविले आहे.
Tags
news
