नंदुरबार दि . 29 : जिल्ह्यातील अधिकधीक नागरिकांची स्वब तपासणी करून कोरोना संपर्क साखळी तोडण्याचा प्रयत्न करावा , तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी आजाराची प्राथमिक लक्षणे असतानाच स्वब तपासणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड के सी पाडवी यांनी दिले .
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते . यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड , पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , अपर जिल्हाधिकारी महेश पाटील , सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत , अविशांत पांडा , निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . रघुनाथ भोये आदी उपस्थित होते .
अॅड पाडवी म्हणाले , जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब सुरु झाल्यामुळे जास्तीत जास्त स्वब तपासणीसाठी फिरत्या पथकांची व्यवस्था करावी आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरीत उपचार सुरू करण्यात यावे .नागरिकांनीदेखील लक्षणे आढळल्यास वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी .
खाजगी कोविड रुग्णालयात शासकीय दरानेच सेवा दिली जाईल व नियमांचे पालन होईल यांची संबंधितांनी दक्षता घ्यावी . खाजगी रुग्णालय वाढीव दराने बिल देत असल्याच्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी . मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात . जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे . कोरोना बाधित व्यक्तिंची संख्या सातत्याने वाढत आहे . ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यामातून सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत . या प्रयत्नांना नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे .
विशेषत : ग्रामीण भागात नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर केला पाहिजे . अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे , घराबाहेर पडल्यावर शारिरीक अंतर राखावे व हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनेटायझर लावावे . अधिकारी , कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रबोधन करावे , असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत नवापूर , शहादा , चिंचपाडा तसेच अक्कलकुवा येथे कोविड रुग्णासाठी कोविड हॉस्पीटल आणि कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत तसेच सुरक्षा व्यवस्था , रोजगार हमी योजना , सार्वजनिक वितरण प्रणाली खरीप पीक कर्ज वनदावे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . बैठकीस प्रातांधिकारी , तहसिलदार तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
Tags
news
