धुळे, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शनिवार 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद, धुळे येथे महिला व बालविकास योजनांसाठी असलेल्या महिला व बालविकास भवनचे उदघाटन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालविकास भवनची स्थापना करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. त्यानुसार या भवनसाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाने जिल्हा परिषदेला केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आवारात आरोग्य विभागाच्या औषधालयाच्या वरच्या मजल्यावर महिला व बालविकास भवन कार्यान्वित होणार आहे.
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय, एकात्मिक बालविकास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय ही भाडेतत्वावरील व इतर शासकीय इमारतींमधील जागेत कार्यरत आहेत. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची कार्यालये एकाच छताखाली आणल्यास लाभार्थ्यांना योजनांची अंमलबजावणी होवून नागरिकांची गैरसोय टाळता यावी म्हणून महिला व बालविकास भवन उपयुक्त ठरणार आहे. या भवनच्या पूर्णत्वासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे श्री. बागूल यांनी म्हटले आहे.
Tags
news