धुळे, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातून
पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक आणि विविध कार्यकारी
सहकारी संस्थांच्या सचिवांकडे अर्ज सादर करावेत. ते शेतकऱ्यांचे
अर्ज संबंधित बँकेच्या शाखेत सादर करतील. त्यानंतर संबंधित बँकेने
पीक कर्ज मंजुरीची प्रक्रिया पाच दिवसांत पूर्ण करून निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली
आहे.
राज्यस्तरीय
बँकर्स समिती मार्फत खरीप 2020-2021 हंगामातील पीक कर्ज वाटपासाठी धुळे जिल्ह्यातील
19 बँकांना 837 कोटी 66 लाख
रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. 31 जुलै 2020 पर्यंत धुळे जिल्ह्यातील बँकांनी 32 हजार 79 शेतकऱ्यांना 262 कोटी 61 लाख रुपयांचे
पीक कर्ज वाटप करून 31.40 टक्के लक्षांक साध्य केला आहे.
या शेतकऱ्यांपैकी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019
अंतर्गत लाभ मिळालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 13 हजार 311 शेतकऱ्यांना 85 कोटी 59
लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे.
धुळे जिल्ह्यातील 11 राष्ट्रीयकृत बँकाना 591
कोटी 75 लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
देण्यात आले आहे. त्यापैकी 31 जुलै 2020
अखेर 136 कोटी 56 लाख रुपयांचे
पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यातील
11 खासगी बँकाना 91 कोटी 44 लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
देण्यात आले आहे. त्यापैकी 31 जुलै 2020
अखेर 18 कोटी 90 लाख रुपयांचे
पीक कर्जवाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेस 4 कोटी 30 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात
आले आहे. त्यापैकी 31 जुलै 2020
अखेर दोन कोटी 44 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. धुळे व नंदुरबार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस 150
कोटी 17 लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
देण्यात आले आहे. त्यात 31 जुलै 2020
अखेर 104 कोटी 71 लाख रुपयांचे
पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
खरीप पीक कर्ज वितरणाचा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी
आढावा घेतला आहे. मागील आठवड्यात कृषी मंत्री दादाजी भुसे यांनीही
पीक कर्ज वितरणाचा आढावा घेवून पीक कर्ज वितरणासाठी व्यापक अभियान राबवावे,
अशा सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील
बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, ॲक्सिस बँक
व धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या
50 टक्क्यांपेक्षा अधिक पीक कर्ज वाटप केलेले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत
आधार प्रमाणीकरणासाठी एकूण 45 हजार 829 शेतकऱ्यांची यादी उपलब्ध झालेली आहे. त्यापैकी
43 हजार 540 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले
असून 2 हजार 289 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण
करणे शिल्लक आहे. संबंधित शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा
केंद्र, सीएससी सेंटर
किंवा बँक शाखेत संपर्क करून 15 ऑगस्ट 2020 पूर्वी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पिकाचे जोपासणीसाठी भांडवलाची तसेच अल्पमुदत
कर्जाची गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी
तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यास्तव सहकार आयुक्त व निबंधक,
सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील 31 जुलै 2020 रोजीच्या पत्रानुसार निर्देशित केल्याप्रमाणे पीक कर्जवाटपाचा आढावा घेऊन उपाययोजना
करणे आवश्यक असल्याने तालुका स्तरावर पीक कर्जवाटप आणि महात्मा जोतिराव फुले शेतकरी
कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नव्याने पीक
कर्जवाटप करणे यासाठीच्या कार्यवाहीचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.
यादव यांच्या आदेशान्वये तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली उप/सहायक निबंधक आणि तालुक्यातील सर्व बँकेच्या शाखा व्यवस्थापकांची तालुकास्तरीय
उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे.
तालुक्यातील शेतकरी खातेदारांची एकूण संख्या निश्चित करून त्यापैकी पीक कर्ज
घेण्यासाठी पात्र असलेल्या शेतकरी खातेदारास पीक कर्ज मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत
आणि पात्र शेतकऱ्यास तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या शाखा स्तरावर
कार्यवाही व्हावी याकरिता तालुकास्तरावर उपसमितीचे गठन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय उपसमितीच्या सभा आठवड्यातून
किमान दोन वेळा अथवा आवश्यकतेनुसार घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, असेही जिल्हा उपनिबंधक डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे.
