धुळे -सर्वत्र कोरोना च्या भितीखाली लोकं वावरत असतांना अनेक दवाखाने बंदावस्थेत असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्यात सर्वात जास्त फरफट होतेय ती गरीबांची. उपचाराअभावी अनेकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली असतांना डॉक्टर जितेंद्रजी ठाकूर पुन्हा एकदा गरिबांसाठी देव म्हणून समोर आले आहेत. शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील गरीब आदिवासी मधुकर भिल यांचे लिव्हर फुटल्याने मरणाच्या दारात असलेल्या या आदिवासी बांधवाचे आरोग्यदूत डॉ जितेंद्र ठाकूर साहेब यांनी तातडीचे ऑपरेशन करून प्राण वाचवले.
निमझरी येथील मधुकर भिल यांना अचानक पोटात दुखू लागल्याने गावातील लोकांनी शिरपूर येथे नेले असता डॉक्टरांनी लिव्हर फुटल्याचे सांगून तात्काळ धुळे किंवा मुंबई नेण्याचे सांगितले. गरिबीमुळे ऑपरेशन कसं आणि कुठे करावं हा मोठा प्रश्न होता. शेवटी हिंमत करून धुळे गाठलं पण दवाखान्यात दाखल करायला कुणीच तयार नव्हते. यात रुग्णाची प्रकृती अधिकच चिंताजनक होत होती. तेव्हा गावातील शिवा भिल यांना आठवले की डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी आपल्याच गावातील महिलेच्या पोटातून 9 किलोचा गोळा काढला होता. तेव्हाही मोफतच ऑपरेशन केल्याचे आठवल्यामुळे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली असता डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये आपल्या आदिवासी रुग्णास दाखल करून घेतले व ऑपरेशनही केले तेही अगदी मोफत ऑपरेशन करून जीवदान दिले.
डॉ जितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाची कोणतीही भीती न ठेवता रुग्णसेवेला महत्त्व देऊन आदिवासी व्यक्तीचे प्राण वाचवण्याला प्राधान्य दिले.
मोफत ऑपरेशन करून आदिवासी व्यक्तीचा जीव वाचवल्याबद्दल डॉ साहेबांचे गावातील आदिवासी बांधवांनी आभार मानले.
