धुळे जिल्ह्यातून आणखी दहा जणांची कोरोनावर मात




धुळे, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून आज आणखी 10 जणांनी कोरोना विषाणूवर मात केली. त्यात भांडूप (मुंबई) येथील सहा जणांचा, तर राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन जवानांसह धुळे शहरातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या आता 47 वर पोहोचली आहे. या दहा जणांना आज  डिस्चार्ज देण्यात आला. 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे डेडिकेटड कोविड हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 70 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 37 रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. त्यात आज 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या दहा जणांमध्ये मुंबई- आग्रा महामार्गावर धमाणे गावाजवळ झालेल्या अपघातातील सहा जणांचा समावेश आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाचे तीन जवानही कोरोनामुक्त झाले. त्यांना आज दुपारी सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, डॉ. रामानंद, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते. 
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, महसूल, बंदरे, खार विकास जमिनी, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.
असे असले तरी नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. शारीरिक अंतर ठेवावे. नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हाधिकारी श्री. यादव, पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी केले आहे. 
00000

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने