जाळ -महिमा : एक सुंदर काव्यानुभूती



     वृक्ष कधीही या गोष्टीमुळे दुःखी होत नाही की त्याने किती पाने-फुले-फळे गमाविलीत . वृक्ष सदैव नव्या पाने-फुले आणि फळांच्या निर्मितीत व्यस्त असतात . मनुष्याने वृक्षापासून खूप काही शिकण्यासारखे आहे . आपण किती गमावले त्याचा खेद न करता अजून नवीन काय उभारता-कमावता येईल यातच जीवनाची खरी सार्थकता आहे . भारतीय संस्कृती -भारतीय शास्रे प्राचीन काळापासून नेहमीच 'चरैवेति -चरैवेति' ची प्रेरणा देत आलेली आहेत . 
        विविध भारतीय भाषांमधील साहित्य कृतींमध्ये वृक्षांच्या गुणधर्मांचा गौरव करण्यात आलेला आहे .  'कर्मण्ये वाधिकारस्ते ----'  या श्रीमद भगवद गीतेतील श्लोकानुसार फळाची अपेक्षा न करता आणि आपल्या अविरत दातृत्व-सेवेचे कोणतेही प्रदर्शन / जाहिरात  न करता  फक्त देत राहणे हा वृक्षांचा मूळ गुणधर्म विश्वातील समस्त मानवतेसाठी किती प्रेरक आणि उद्बोधक आहे , नाही का ? पाणी टाकणाऱ्या आणि दगड मारणाऱ्या अशा सत्प्रवृत्ती आणि विकृतीला सुद्धा समान आश्रय देणे --समान शुभाशीष देणे ----एवढे अलौकिक औदार्य या जगात फक्त वृक्षांनाच जमू शकते . 
        सध्या कोरोनारूपी संकटाने विश्वातील मानव जमात समूळ हादरून गेलेली आहे . अनेकांच्या मनावर या संकटाने प्रतिकूल परिणाम केलेले असून अनेकांचे मानसिक स्थैर्य बिघडत चाललेले आहे . अनेकजण अकारण मानसिक दृष्ट्या  खचलेले  आहेत .अशा पार्श्वभूमीवर सर्वदूर पसरलेल्या भयग्रस्त वातावरणात वृक्ष निश्चितच आशेचे प्रेरक दीपस्तंभ ठरू शकतात .  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीसुद्धा वृक्ष /वनस्पती आपले मूळ गुणधर्म कधीही सोडत नसतात .  
आमचे राजस्थानी मित्र श्री शंभूसिंह चौहान ,बावरला यांच्या मूळ राजस्थानी भाषेतील कवितांमध्ये वृक्षांच्या विविध गुणधर्मांचे सुंदर-मनोवेधक  चित्रण असून मराठीच्या खास वाचकांसाठी व साहित्यप्रेमींसाठी "जाळ-महिमा" या काव्यावर हा आजचा शब्दप्रपंच ! 

गहरी जड़ा खमत घणी, 
क्या बिगाड़े काळ।
मझ गरमी फाले घणी,
जाडे पानां जाळ।।१।।


उपरोक्त पद्यात कवी श्री शंभूसिंहजी म्हणतात की , ज्यांची पाळेमुळे खोलवर आणि घट्ट रुतलेले असतात त्यांचे 'काळ' किंवा अन्य 'आपत्ती' काहीही बिघडवू शकत नाही . उष्ण वाळवंटात सुद्धा प्रचंड उष्मा असतांना 'जाळ' सारखा वृक्ष घनदाट छाया देत असतो . म्हणजेच भयानक उष्णतेला अंगावर घेऊन सुद्धा सदरहू वृक्ष आपला मूळ गुणधर्म सोडत नाही . 

मझ "लू" में पीलू पके,
वरे जेठ री झाल।
मेवों दे मुरधर मधुर,
जाडां पानां जाळ।।२।।


जेष्ठ महिन्यात चहू दूर वाहणारी हवा ही अत्यंत उष्ण असते आणि जणूकाही ती आगच ओकत असते अशा उष्म्यात खाखन किंवा पिलू च्या वृक्षांवर गोड -रसाळ आणि मधुर फळे येत असतात . 'जाळ' वृक्ष वाळवंटातील उष्ण वातावरणात देखील वाळवंटातील पथिकांना गोड फळे देत असतात . सभोवतीच्या वातावरणाचा त्या वृक्षाच्या मूळ गुणधर्मात काहीही बदल होत नाही . 

पान झड़े सब रूंख रा,
करमो ग्रीषम काळ।
पशु पंछीड़ा ओट दे,
जाडां पानां जाळ।।३।।


      ग्रीष्म ऋतू हा इतका प्रतिकूल असतो की ज्या काळात इतर अनेक वृक्ष -वनस्पती पर्णविहीन होऊन जातात , मात्र त्याच काळात वाळवंटातील ''जाळ'' मात्र हिरवागार असतो आणि पशु-पक्षी-पांथस्थांना शीतल छाया देत असतो . थोडक्यात जेव्हा सृष्टीतील प्रतिकूलतेत सुद्धा 'जाळ ' वृक्ष तग धरतो आणि आपले सेवा कार्य सुरूच ठेवतो . 
 
कै रूंख दस बीस बरस,
ओछो बधतो काळ।
सदियां री साखी खड़ी,
जाडां पानां जाळ।।४।।

        अनेक वृक्ष हे जास्तीत जास्त दहा-वीस वर्ष जगतात किंवा अजून काही वर्ष तग धरतात मात्र शुष्क वाळवंटात जेथे सर्वदूर पाण्याचा प्रचंड अभाव आहे , जेथील परिस्थिती ही अत्यंत विषम आहे अशा वाळवंटात सुद्धा 'जाळ ' नावाचा हा अद्भुत वृक्ष युगानुयुगे टिकून राहतो . मनुष्याने सुद्धा आलेल्या प्रतिकूल-विषम संकटांवर मात करून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी 'जाळ' या वनस्पतीपासून प्रेरणा घेतली पाहिजे . 

पीरां रोपी पीपळी,
मालै रोपी जाळ।
जांभा वाळी खेजड़ी,
अपणे अपणे काळ।।५।।

मक्केहून आलेल्या पीरांनी जेव्हा आपल्या दात घासण्यासाठी ज्या पिंपळाच्या काड्या वापरून जमिनीत रोवल्या होत्या त्याच काड्यांमधून बाबा रामदेवांनी आपल्या अध्यात्मिक शक्तींचा वापर करून पंच-पिंपळाची निर्मिती केली होती . महेवा गावाचे रावल माला जे पुढे सिद्ध मल्लिनाथ नावाने प्रसिद्ध झाले , त्यांनी लावलेला  'जाळ' वृक्ष आणि जांभाजी यांनी लावलेला 'खेजडी' चा वृक्ष आजसुद्धा आहेत . 

महाराष्ट्रात संतश्रेष्ठ तुकोबारायांनी 'वृक्षवल्ली आम्हां सोयरे --वनचरे ' सारखे अभंग लिहून किंवा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्षांच्या संरक्षणासाठी 
विशेष आज्ञापत्रे लिहून वृक्षांप्रती आपली निस्सीम भक्तीच व्यक्त केलेली होती . एकंदरीत सर्वच महापुरुषांनी वृक्षांवर अतोनात प्रेम केलेले आढळून येते . 
वृक्षांची महती अनन्य साधारण आहे . 
आपल्या ''Stopping by Woods on a Snowy Evening ' या कवितेत  
''The woods are lovely, dark and deep,   
But I have promises to keep,   
And miles to go before I sleep,   
And miles to go before I sleep.
"Woods are lovely, dark and deep''
  म्हणणारा रॉबर्ट फ्रॉस्ट हा इंग्रजी साहित्यातील कवी देखील हाच संदेश आपल्या या अजरामर काव्यपंक्तीतून देऊ इच्छितो . 
उपरोक्त ''जाळ -महिमा'' या कवितेच्या माध्यमाने कवी श्री शंभूसिंह चौहान यांनी वाळवंटातील वृक्षांची महिमा अत्यंत सुंदर पद्धतीने रेखाटलेली आहे . असामान्य प्रतिभेचे धनी असलेले श्री शंभूसिंहजी  चौहान यांचे शिक्षण फक्त १२ वी पर्यंत झालेले असून मुंबई शहरात स्टील पाईप विक्रीचा त्यांचा छोटासा व्यवसाय आहे . श्री शंभूसिंहजी चौहान हे राजस्थानातील वाळवंटी भागातील बाड़मेर जिल्हयातील बावरला या गावाचे निवासी आहेत . वाळवंटातील व्यथा व कथा त्यांच्या सहज-उत्स्फूर्त लेखणीतून ते मांडत असतात .  दररोज राजस्थानी भाषेत निसर्ग , पशु-पक्षी-मानव समाज आणि मानवी स्वभाव अशा विविध विषयांवर ते अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्या भावना कवितांच्या माध्यमाने अभिव्यक्त करत असतात . प्रस्तुत कवितेच्या माध्यमाने सुद्धा त्यांनी 'जाळ' या वाळवंटात मोठया प्रमाणावर आढळून येणाऱ्या वनस्पती बद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत .

 *लेखक : श्री जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे* 
वाठोडा (शिरपूर) ९४२२७८८७४० 
jaypalg@gmail.com

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने