आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र बचाव आंदोलन झाले व आंदोलनाचा फज्जा उडाला. महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणुने थैमान घातलेले असतांना संपूर्ण भारत देश व महाराष्ट्र कोरोना विषाणुशी लढत असतांना भारतीय जनता पक्षाच्या उद्दाम नेत्यांना राजकारण सुचतयं…..
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार, गृहमंत्री श्री.अनिल देशमुख, आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपेसह संपूर्ण मंत्रीमंडळ, प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस कोरोना विषाणुशी लढत आहे. अशा परिस्थितीत कुठलेही राजकारण न करता केवळ कोरोना विषाणुशी लढतांना विरोधी पक्षाने सरकार सोबत उभे राहणे व सरकारला मदत करणे हाच खरा पुरुषार्थ आहे….. असला पुरुषार्थ पुरोगामी महाराष्ट्राने अनेकदा महाराष्ट्रावर आलेल्या संकटात बघितलेला आहे. महाराष्ट्र ही विचारवंतांची, संतांची व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरीत झालेली भूमी आहे. महाराष्ट्र ज्या वेळेस संकटात असतांना मदत न करणाऱ्या विरोधी पक्षाला महाराष्ट्र राज्यातील विचारी व प्रगत जनता कदापि माफ करणार नाही. महाराष्ट्र राज्याने अनेक कर्तृत्ववान मुख्यमंत्री बघितले. परंतु मागील पाच वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ जनता अजून विसरलेली नाही….. सत्तेचा व पदाचा दुरुपयोग उभ्या महाराष्ट्राने बघितला. शिवसेना सारख्या मित्राला संपविण्याचे कटकारस्थान भाजपाने केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर पुढाऱ्यांना शासकीय चौकशी, ईडी, पोलीसांकरवी खोटे-नाटे गुन्हे दाखल करुन भारतीय जनता पक्षात आणण्याचे कटकारस्थान आजच्या विरोधी पक्षाने केले. माननीय उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांचेवर खोटे-नाटे दाखल केलेल्या गुन्ह्यांवर आपण एका रात्रीत त्यांना क्लिनचिट दिलेली उभ्या महाराष्ट्राने पाहिली. माननीय शरद पवार साहेबांवर गुन्हा दाखल करुन सक्त वसुली संचालनालयाची चौकशी आपल्याच राज्यात झाली त्याचे परिणाम पण आपण भोगले. आपल्या धुळे जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांना चौकशी लावून आयकर विभागाच्या धाडी टाकून ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसावर बलात्कारासारखे गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन त्रास देण्याचा उद्योग भाजपच्या राज्यात झाला. धुळे, नाशिक, जळगांव, अहमदनगर महापालिका निवडणुक कशा प्रकारे जिंकली. पैशाचा व सत्तेचा प्रचंड दुरुपयोग भाजपाच्याच सत्ताकाळात झाला. हेच काय? तर आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना त्यांचेवर खोटे-नाटे आरोप करुन संपविण्याचा प्रकार व विधान परिषद निवडणुकीत त्यांना डावलून आपल्या खुशमस्कऱ्यांना निवडून आणल्याचा प्रकार उभ्या महाराष्ट्राने बघितला….. ज्यांचे विचार घाणेरड्या राजकारणाने प्रेरित असलेल्या महाराष्ट्र भाजपाच्या पुढाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कदापि माफ करणार नाही. आणि त्यांना तर संकटाच्या काळात महाराष्ट्राला केंद्रातून महाराष्ट्राच्या हिश्श्याचे पैसे किंवा मदत मिळवून न देता घाणेरडे राजकारण करणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रीतील जनता आता भाजप भगाव….महाराष्ट्र बचाव…. केल्याशिवाय राहणार नाही. असे शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी पत्रकान्वये कळवले आहे.
