चमचमते तारे ,ऑर्गन वादक केदार भागवत ,,




दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी

    कलाक्षेत्रात काम करणारे प्रत्येकजण हा चमकता तारा असतो, कुणी अभिनय करतो, कुणी विविध क्षेत्रात काम करणारे असतात, रंगभूमी, सिनेमा, मालिका, मध्ये त्यांचे अनेक प्रकाराने योगदान असते, रंगभूमी,, संगीत रंगभूमी मध्ये गायक , गायिका कलाकार " चमचमते तारे "  ऑर्गन वादक केदार भागवत ,, प्रमाणेच वादन करणारे सुद्धा कलाकारच असतात, आज आपण ऑर्गन वादन करणारे कलाकार केदार भागवत यांची ओळख करून घेऊया, त्याच्या कलेचा प्रवास जाणून घातलाय आमचे प्रतिनिधी दीनानाथ घारपुरे यांनी 
     सुरवातीला मला सांग कि,  संगीत आणि पेटी वादन याची आवड कशी निर्माण झाली. ?  
     पेटी वादनाचे सुरवातीचे शिक्षण माझे वडील प्रभाकर भागवत यांच्याकडे झाले, त्यानंतर १९७३ साली त्यावेळी मी तीन वर्षाचा होतो, आम्ही दरवर्षी माझ्या मामांच्या घरी जायचो, त्यावेळी तिथे गायनाचा कार्यक्रम व्हायचा, माझी आई हि छान गाते, त्यावेळी त्यांचा कार्यक्रम संपला कि मी पेटी वाजवायला बसायचो, त्यावेळी माझे बाबा मला ओरडायचे, " अरे ती पेटी खराब करशील " असे म्हणायचे, त्यावेळी माझे मामा बाबांना सांगायचे कि " माझी पेटी मोडली-खराब झाली तरी चालेल, पण माझ्या भाच्याच्या अंगात ती कला आहे तर त्याला ती पेटी वाजवू दे. त्यामुळे मला माझ्या मामा मंडळींनी मला पेटी देऊन टाकली, तेव्हापासून माझी पेटी वाजविण्याची सुरवात झाली. त्यानंतर माझ्या मामांनी मला तीनशे रुपयाची पेटी घेऊन दिली ,,, माझे मामा गुरुनाथ बाकरे, प्रभाकर बाकरे, आणि विलास बाकरे हे तीन माझे आदर्श आणि गुरुस्थानी आहेत. माझी आई चांगली गायची त्यामुळे सगळी नाट्यगीते मी तिच्याकडून शिकलो. 
     म्हणजे पेटी वादनाचे आकर्षण तुला होतेच मग पुढे  तुला मार्गदर्शन कोणी केले ? 

    माझे पहिले गुरु माझे वडील प्रभाकर भागवत, त्यावेळी मी घरी रेडीओ ऐकत असताना त्यावेळी जुनी गाणी प्रसारित व्हायची, उदा. बरसात, श्री ४२०, आवारा, आणि इतर चित्रपटामधील गाणी मी ऐकत असे, त्या बरहुकूम मी पेटीवर वाजवत असे. त्यावेळी वडिलांना जाणवले कि हा नक्की कलाकार होणार, उत्तम पेटीवादक होणार, तेथून माझ्या पेटीवादन प्रवासाला सुरवात झाली. त्यानंतर १९७६ साली माझा पहिला कार्यक्रम स्वतंत्र सोलो पेटीवादन करण्याचा दादर येथील छबिलदास हायस्कूल मध्ये झाला, त्यावेळी तेथे अठरा नाट्यगीते आणि चार चित्रपट गीते सादर केली. त्यामधून माझा उत्साह वाढला, त्यानंतर साथ-संगत करायला सुरवात करताना प्रथम नीलाक्षी पेंढारकर, आणि स्मिता गाडगीळ यांच्या बरोबर गणेशोत्सवातील कार्यक्रम केले. 
     आणखी कुठे कुठे कार्यक्रम झाले ? व्यावसाईक नाटकाला साथ करण्याची संधी कधी मिळाली ? 
आकाशवाणी मुंबई मधील बालकलाकारांचा कार्यक्रम “ गंमत जंमत “ मध्ये स्वतंत्र पेटीवादन करण्याचा कार्यक्रम केला हा कार्यक्रम मला वडिलांचे मित्र उमाकांत ठोंबरे यांच्यामुळे मिळाला. त्यानंतर नाटकांना साथ-संगत करण्याची संधी मिळाली, आमच्या ओळखीचे प्रभाकर साने ह्यांनी संगीत सौभद्र नाटकाचे आयोजन केल होते त्यांच्या नाटकामधील  गीतांसाठी मी ऑर्गन ची साथ केली. त्यानंतर व्यावसाईक कलाकरांनी सादर केलेलं संगीत सौभद्र ला साथ करण्याची पहिली संधी मला सुप्रसिद्ध गायक कलाकार भालचंद्र पेंढारकर यांनी दिली हा प्रयोग गोवा येथे होता, त्यावेळी मी १२ / १३  वर्षाचा होतो.  त्यामध्ये भालचंद्र पेंढारकर, अरविंद पिळगावकर, रजनी जोशी , नीलाक्षी पेंढारकर, असे मोठे कलाकार होते. हा प्रयोग पाहण्यासाठी नटवर्य प्रसाद सावकार पहिल्या रांगेत बसले होते, 
         ऑर्गन वाजविण्याचा प्रवास माझा सुरूच होता, आत्तापर्यंत मी व्यावसाईक संगीत नाटकांना  सुमारे अडीच हजार  प्रयोगांना साथसंगत केली आहे. त्यामध्ये सौभद्र, मानापमान, मृच्छकटिक, देव माणूस, कट्यार काळजात घुसली, मदनाची मंजिरी, संशयकल्लोळ, गोरा कुंभार, अवघा रंग एकची झाला, आणि आता चि.सौ.का.रंगभूमी, अशी अनेक नाटके आहेत. 
    पेटी वादनाची साथ मैफिल करणाऱ्या कलाकारांना सुद्धा लागते त्याविषयी तुझा अनुभव काय ? 

   नाटकाचे प्रयोग सुरु असतानाच मला मैफिली मध्ये फार मोठे सहकार्य पंडीत अजित कडकडे यांनी केले, हे मी विसरू शकत नाही. त्यांच्या बरोबर मी १९९७ साला पासून २०१० पर्यंत होतो. त्यांच्या बरोबर मी अनेक मैफिली मध्ये सहभागी होतो. साधारण ३५० मैफिली मी त्यांच्या बरोबर केल्या. त्याच बरोबर उपेंद्र  ,  रजनी जोशी , अरविंद पिळगावकर, रामदास कामत , ज्ञानेश पेंढारकर नीलाक्षी पेंढारकर, यांच्या मैफिलीमध्ये माझा सहभाग असायचा. साधारणत १५०० च्या वरती  मैफिली केल्या. माझे ऑर्गन मधील गुरुस्थानी असलेले ज्येष्ठ ऑर्गन वादक पंडित गोविदराव पटवर्धन, पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. तुळशीदास बोरकर, पं आल्हाद हटकर, पं मकरंद कुंडले, पं चंद्रचूड वासुदेव,  हे माझे आदर्श आहेत. 
     
संगीत नाटकाला साथ करताना अनेक गोष्टी चे भान ठेवावे लागते तुझा अनुभव काय सांगशील ?

          संगीत नाटकाला साथ-संगत करताना आपल्याला लक्षपूर्वक ऐकावे लागते, रंगमंचावरील गायक, त्याचे संवाद व्यवस्थित बोलतोय कि नाही, शेवटच वाक्य संपल्यावर गाण्याच्या अगोदरचे वाक्य बोलून झाले कि आम्हाला त्याला “ सूर “ द्यावा लागतो, तो स्वर व्यवस्थित टायमिंग ने वजनाने दिला कि गायक तो स्वर ऐकून आपले गीत व्यवस्थित सादर करतो. “ स्वर “ देणे तो गायकाने ऐकणे आणि गाणे सुरु करणे --- हे सूर / ताल खूप महत्वाचे असते. त्यामुळे ऑर्गन वाजविणाऱ्या ना लक्षपूर्वक ध्यान देणे हे महत्वाचे असते. 
       

संगीतामध्ये नाट्य संगीत त्याच प्रमाणे शास्त्रीय सांगितला खूप महत्व आहे त्याचे शिक्षण कोणाकडे झाले ?

          रागदारीचे माझे शिक्षण हे माझे गुरु पं. चंद्रचूड वासुदेव यांच्या कडून झाले, त्यांनी मला रागदारीचे शिक्षण देताना कलाकाराला ओर्गांचे टायमिंग कसे द्यायचे हे शिकविले. शास्त्रीय संगीताची मैफिल जर चालू असेल तर त्या कलाकाराला फक्त साथ द्यायची, आपण त्याच्या पुढे कधी जायचे नाही. परंतु नाटकामध्ये ऑर्गन चि साथ करताना गायकांनी ज्यावेळी आपणाला सोडलेलं असते त्यावेळी आपण वेगळे  कौशल्य दाखवून वाजवायचे, आणि ऑर्गन वादनाला टाळी घ्यायची. अश्या काही सूचना दिल्या. शास्त्रीय संगीता मध्ये “ आलाप “ ला खूप महत्व आहे. विलंबित / बडाख्याल मध्ये कुठल्या प्रकारे मध्येच न वाजवता गायकाने सोडल्या नंतर तेव्हढीच लाईन वाजवायची. त्या पेक्षा जास्त वाजवायचे नाही. 
       

नाट्य संगीत वाजवताना त्या गीताचे बोल / शब्द पाठ असणे गरजेचे असते त्याविषयी आणि एखादी  आठवणी विषयी  काय सांगशील ? 

          नाट्य संगीत हे तोंडपाठ असायलाच लागते, नाहीतर त्यातील जे “ रस्व-दीर्घ “ शब्द आहेत ते आपल्याला वाजवता येणार नाहीत. एखाद्या गायका बरोबर सतत राहून त्याची “ तान “ पुढे कशी येणार आहे त्याचा अंदाज येतो. नाटकामधील गाणे हे फिक्स असते कारण वेळेची मर्यादा असते. पण मैफिली मध्ये एखादा गायक नाट्यसंगीत गाताना वेगळी तान जर घेऊन गेला तर ते अनुभवाने आपणाला शिकता येते. 
     

           आठवणी खूप आहेत त्यातील काही सांगतो,,,,, एकदा गोव्याला संगीत सौभद्र चा प्रयोग होता, पं प्रसाद सावकार हे नाटकाला आले होते, त्यांनी मला ऑर्गन वर बसलेला बघितला त्यावेळी ते म्हणाले “ अरे हा कोण मुलगा ऑर्गन वर बसला आहे “ त्यांना सांगितले हा मुलगा ऑर्गन छान वाजवतो, आणि त्याचा हा पहिलाच प्रयोग आहे, त्यांनी माझा ऑर्गन ऐकला आणि त्यांचे मला आशीर्वाद मिळाले. असाच एक प्रयोग उजगावला होता, त्यावेळी एक ७५ वर्षाचे गृहस्थ आले आणि ते एकदम माझ्या पाया पडू लागले मी भांबावून गेलो त्यावेळी ते म्हणाले “ मी तुझ्या ऑर्गन वादनाला “ नमस्कार केला आहे. तुझ्या कलेला माझा नमस्कार आहे. पुण्याला कट्यार काळजात घुसली चा प्रयोग होता, मला नाटक माहित होते मी पुण्याला गेलो त्यांनी माझ्या समोर स्क्रिप्ट ठेवले पण ह्या प्रयोगात गाणारे कलाकार कोण आहेत कसे गातात हे काहीच माहित नव्हते, पण तरी सुद्धा मी व्यवस्थित साथसंगत केली. मला त्यांच्या कडून शाबाशकी मिळाली हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ,,, आम्ही एकदा पं राधारमण कीर्तने यांच्या बरोबर बंगलोर ला गेलो होतो त्यावेळी माझे नुकतच लग्न झाले होते, ह्या वर्षाची दिवाळी घरात साजरी होईल अस वाटल होत पण दिवाळी बंगलोर ला साजरी झाली त्यांनी सांगितल कि तू तुझ्या पत्नीला सुद्धा घेऊन चल, आम्ही दिवाळी पहाट चा कार्यक्रम तिकडे केला. पहाटे साडेचार ला सुरु झालेला कार्यक्रम खूपच रंगला सगळी नाट्यसंगीत होते. आमच्या बरोबर रजनी जोशी होत्या, आणि तो कार्यक्रम साडेपाच तास चालला होता, माझ्या आयुष्यातील ती मोठी दिवाळी होती.  ,, राजीव जोशी यांनी विलेपार्ले येथे “ कट्यार “ च्या प्रयोगाचे वाचन आणि गाणी असा संगम असलेला रसभरीत कार्यक्रम सादर केला. त्या मध्ये राम देशपांडे, मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटे असे गायक कलाकार होते, त्यामधील शेवटची जुगलबंदी खूपच रंगली, दोघांचे स्वर जरी एकच असले तरी गायकी वेगळी होती, त्यामुळे साथसंगत करताना मला घाम फुटला होता, पण मी अत्यंत काळजीपूर्वक साथ केली.  ,,,  संगीत राज्य नाट्य स्पर्धे मध्ये मी १९९७ पासून साथसंगत करीत आहे, त्यामध्ये २००० साली सांगलीला संगीत मृच्छकटिक नाटकाचा प्रयोग होता, त्यावेळी प्रयोग रंगला, आणि साथसंगतीचे ऑर्गन वादनाचे मला पहिले पारितोषिक मिळाले, हा एक माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. राज्य नाट्य स्पर्धे साठी वादन करतना त्या स्पर्धेच्या नाटकाची तालीम चार / पाच वेळा केलेली असते, हि स्पर्धा आव्हानात्मक असते, अनेक स्पर्धक सहभागी झालेले असतात, त्यामधून आपल्याला वेगळे दाखवायचे असते, त्या मध्ये पूर्ण गायकी आम्हाला पाठ असते, एकदा संगीत स्वयंवर हे नाटक आम्ही स्पर्धेला सादर केल त्यासाठी सुमारे एक-दीड महिना आम्ही संगीताची तालीम केली कारण त्या नाटकातील गाणी हि खूप अवघड आहेत, सगळी रागधारीवर आहेत. 
        

संगीत आणि वादन आजकाल बरीच मुले शिकतात नवीन गायक गाण्यासाठी बसतात त्या विषयी काय सांगशील  ?     

          नवीन मुले आजकाल तबला-ऑर्गन-पेटी वादन शिकतात त्यांची तयारी खूप छान असते, गुरु पण चांगले मिळालेले असतात, साथ करताना गायकाला फक्त साथच करा, त्यांच्या पुढे जाऊ नका, किंवा गायक / गायक डिस्टर्ब होईल असे काही करू नका, एखादी जागा नाही समजली तर तेथेच थांबून रहा, किंवा षड्ज-पंचम-षड्ज , असा स्वर धरून ठेवा त्यापुढे अंदाजाने जा. 
             नवीन गायक ज्यावेळी आमच्या बरोबर गायला येतो त्यावेळी आम्ही त्यांना विनंती करतो कि तुम्ही काय काय गाणार आहात, त्याविषयी चर्चा केली जाते. त्या गायकाची गाण्याची पद्धत कशी आहे हे समजून घेऊन त्याला साथसंगत करतो. 

      
  



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने