धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी 31 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित : जिल्हाधिकारी संजय यादव


अत्यावश्यक सेवांमध्ये वाढ ,नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे



धुळे -दि. 21 : धुळे महानगरपालिका हद्दीत व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचे 81 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर धुळे महानगरपालिका हद्दीत 18 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी धुळे शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत 22 मे 2020 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 31 मे 2020 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. ही संचारबंदी नागरिकांच्या हितासाठीच असून नागरिकांनी घाबरून न जाता संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे. 
कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग पाहता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय या शासनाने घेतला आहे. तसेच धुळे जिल्ह्याला लागू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव,जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात व मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा गावात तसेच धुळे महानगरपालिका हद्दीत व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रसार एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता असल्याने जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून ही संचारबंदी लागू राहील. 
या संचारबंदीतून रुग्णालये औषधे विक्रीची दुकाने, सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व त्या अनुषांगिक सेवा,अतितातडीचे शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी,सुरक्षा यंत्रणा व कायदा सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा,बँक यंत्रणा,महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी ,जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी दूरध्वनी इंटरनेट सेवा पुरविणारे अधिकारी व कर्मचारी या अत्यावश्यक सेवा वगळून किराणा दुकाने,शासकीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाहतूक व धान्य वाटप,दूध,भाजीपाला व फळे विक्री दुकाने,कृषी विषयक सर्व प्रकारच्या आस्थापना ,छत्री रेनकोट प्लास्टिक शीट/ कव्हरची दुकाने ,वखार ,कुलर,एसी,पंखे,साहित्याची दुकाने,बांधकाम विषयक सिमेंट,खडी,रेती,स्टील,विटांची आस्थापना तसेच नामांकित कंपनीचे महानगरपालिका हद्दीतील अधिकृत सर्व्हिस सेंटर केवळ दुरुस्ती व देखभाल प्रयोजनार्थ आस्थापना वगळून इतर सर्व व्यवहार खालील कालावधी व अटीस अधिन राहून बंद करण्यात येत आहे.
कोविड-19 प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील अधिकृत किराणा दुकाने,स्वस्त धान्य विक्रीची दुकाने,भाजीपाला,फळ विक्रीची दुकाने,छत्री, रेनकोट,प्लास्टिक शीट/कव्हरची दुकाने, वखार,कुलर,एसी,पंखे साहित्याची दुकाने,बांधकाम विषयक सिमेंट,खडी,रेती,स्टील व विटांची आस्थापना तसेच नामांकित कंपनीचे महानगरपालिका हद्दीतील अधिकृत सर्व्हिस सेंटर केवळ दुरुस्ती व देखभाल प्रयोजनार्थ आस्थापना,दूध विक्रेते, गॅस एजन्सी व पेट्रोलपंपचालकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 2 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. 
या व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी झाल्यास महानगरपालिका व पोलिस प्रशासनाने अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित आस्थापनेवर तत्काळ कार्यवाही करावी. वखार व्यावसायिकांनी ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी. रविवारी संपूर्ण बाजारपेठा व व्यवसाय बंद राहतील. हा आदेश सद्य:स्थितीत व भविष्यात कोविड-19 प्रतिबंधित क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रास लागू राहणार नाही. सदरच्या प्रतिबंधित क्षेत्रात कन्टेन्मेंट अधिसूचनेनुसार घोषित प्रतिबंधानुसार अंमलबजावणी होईल. तसेच राज्य शासनाने संपूर्ण राज्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत संचारबंदी आदेश लागू केलेले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था अथवा संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
 मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 व भारतीय दंड संहिता कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य ती कायदेशीर कारवाईस पात्र राहतील

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने