धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार धुळे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, कंपनी व तत्सम आस्थापना 31 मार्च 2020 पर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, राज्यात ‘कोरोना’ विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू झाला आहे. त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केलेली असून जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ‘कोरोना’ विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
धुळे जिल्हयात औद्योगिक संस्था, कारखाने, उद्योगधंदे व तत्सम व्यवसाय सुरु आहेत. संबंधित आस्थापनांमध्ये धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणावरुन तसेच धुळे जिल्ह्याबाहेरुन देखील कामगार, कर्मचारी, वाहतूक करणाऱ्या व्यक्ती येतात. यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेत त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. संबंधित औद्योगिक आस्थापनांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे आपत्ती जन्य परिस्थिती धुळे जिल्ह्यात उदभवू नये म्हणून धुळे जिल्ह्यात ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिनियमामधील तरतुदी, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियमामधील तरतुदी व मुबई पोलिस अधिनियमाच्या कलमान्वये धुळे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, कंपनी, तत्सम आस्थापना 23 ते 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात येत आहेत.
वरील आदेश औषध निर्माण करणाऱ्या, वैद्यकीय सेवेसाठी पुरविण्यात येणाऱ्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग, व्यवसाय, सॅनिटायजर, साबण, जंतुनाशके, हँडवॉश निर्माण करणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग, व्यवसाय, कृषी उत्पन्नावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग, व्यवसाय, अत्यावश्यक वस्तू व सेवा करणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग, व्यवसायांना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटनेने केल्यास ही बाब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय दंड संहितेनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
00000