चित्रपट " तान्हाजी " जबरदस्त शौर्य गाथा ....



सुभेदार तान्हाजी मालुसरे ,,,, पोलादी पुरुषाची शौर्य गाथा , तान्हाजी ह्या चित्रपटातून उत्तमपणे सादर केली गेली आहे ,  तान्हाजी मालुसरे मनाने खंबीर, उत्तम योद्धा, धैर्यवान, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा नित्सिम भक्त, देशावर प्रेम करणारा स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारा एक महान योद्धा असा होता,
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले, त्याकामी त्यांच्याकडे अनेक मोठे पराक्रमी योद्धे सुभेदार, शिलेदार होते सर्वांच्या मनांत स्वराज्य स्थापन करायचे होतेच. औरंगजेब याला दक्खन वर विजय मिळवायचा होता, त्याने मिर्झा राजे यांना हाताशी धरून शिवाजी महाराजांच्या कडून तहाच्या अटी मध्ये तेवीस किल्ले मागून घेतले त्या मध्ये " कोंढाणा " किल्ला सुद्धा होता, अत्यंत अभेद्य असा हा किल्ला असल्याने त्या किल्ल्याची देखभाल करण्यासाठी किल्लेदार म्हणून उदयभान याची निवड औरंगजेबने केली, आणि त्याला कोंढाणा वर पाठवले, सोबत मोठी फौज दिली. शिवाय एक भली मोठी " नागीण " नावाची तोफ दिली,
उदयभान किल्ल्याकडे निघाला तो कोणत्या मार्गाने येईल ह्याची कल्पना सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना होती पण फंदफितुरी झाली आणि उदयभान ह्याने कोंढाणा कडे जाण्याचा मार्ग बदलला. आणि किल्ल्यावर दाखल झाला,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनांत कोंढाणा घ्यायचा आपल्या स्वराज्यामध्ये आणायचा हे त्यांनी ठरवले होतेच, त्या साठी कोणाला मोहिमेवर पाठवायचे ह्याचा विचार करीत असताना त्यांना सुभेदार तान्हाजी मालुसरे ह्यांचे नाव सुचवले पण तान्हाजी कडे त्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याला पाठवायचे नाही असे महाराजांनी ठरवले असतानाच तान्हाजी मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आमंत्रण देण्यासाठी गडावर आला, सोबत त्याचा मुलगा रायबा आणि पत्नी सावित्रीबाई, धाकटा भाऊ सूर्याजी, आणि शेलारमामा असे होते,
सुभेदार तान्हाजी मालुसरे याच्या लक्षांत आले कि कुठल्यातरी मोहिमेची तयारी सुरु आहे, त्याला पिसाळ सांगतो कि कोंढाणा किल्ला घेण्याची तयारी महाराज करीत आहेत, आणि त्याचवेळी तान्हाजी कोंढाणा च्या मोहिमेवर जाण्याचे पक्के करतो आणि तसे तो महाराजांना सांगतो. घरी सावित्रीबाई हिला सुद्धा सांगतो चर्चा होते पण शेवटी सुभेदार तान्हाजी मालुसरे कोंढाणा च्या मोहिमेवर जायचे पक्के करतो.
कोंढाणा किल्ला हा डोंगरी किल्ला आहे, अभेद्य आहे, तेथे सहजपणे जाणे खूपच कठीण आहे, तेथे जाण्याचा मार्ग कोणता हे ठरवण्या पूर्वी उदयभान कसा आहे हे त्याला पहायचे असते, अत्यंत क्रूर असा उदयभान ची भेट कशी घ्यायची हे ठरवून तो गडावर जातो, तेथून परत येताना त्याला किल्ल्यावर जाण्याचा मार्ग सापडतो कारण पूर्वीचा कोंढाणा चा किल्लेदार ह्यांनी त्याला काही खाणाखुणा सांगून ठेवलेल्या असतात. आणि मग तयारी सुरु होते कोणी कुठे कश्या पद्धतीने जायचे याची मसलत होते आणि काही ठराविक धाडसी मावळ्यांना घेऊन सुभेदार तान्हाजी निघतात. सोबत त्याचा धाकटा भाऊ सूर्याजी, शेलारमामा, आणि स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे मावळे दोरखंडाच्या सहाय्याने अष्टमी च्या दिवशी काळोख्या रात्री गडावर हल्ला करतात. घनघोर युद्ध होते, पुढची कथा मी सांगत नाही त्याचा तुम्ही अनुभव घ्या.
सुभेदार तान्हाजी मालुसरे ची तडफदार व्यक्तिरेखा अजय देवगण ह्यांनी अप्रतिमपणे सादर केली आहे. युद्ध कौशल्य उत्तमपणे सादर केले आहे, तान्हाजीच्या मनांतले कुटुंबाविषयी चे विचार, स्वराज्य विषयीचे प्रेम, शिवाजी महाराज ह्यांच्या विषयीचा आदर सारे काही छान व्यक्त केले आहे, संवादफेक उत्तम, देहबोली छान, सर्वच दृष्टीने भूमिका लक्षांत राहते. सावित्रीबाई ची अर्थात तान्हाजी च्या पत्नीची भूमिका काजोल यांनी छान रंगवली आहे, देश आणि कुटुंब विषयीच्या भावना छान दाखविल्या आहेत. शेलार मामा ची भूमिका शशांक शेंडे, सूर्याजी ची भूमिका देवदत्त नागे, पिसाळ ची भूमिका अजिंक्य देव, यांनी मनापासून केलेली असून त्याला योग्य असा न्याय दिलेला आहे, उदयभान ची भूमिका सैफअली खान यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर , आणि देहबोली ने छान सादर केली आहे, उदयभान चा क्रूरपणा, त्याची शिस्त, इत्यादी भावना त्यांनी उत्तम दाखवल्या आहेत, त्याचे युद्ध कौशल्य हि दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका शरद केळकर यांनी अत्यंत कौशल्याने रंगवली आहे. औरंगजेब च्या भूमिकेत लकी केणी हे आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी उत्तम केले असून चित्रपट सुरवाती पासून प्रेक्षकांची पकड घ्यायला सुरवात करतो, कुठेही चित्रपटाची गती कमी झालेली नाही, उत्तरोत्तर तो रंगत गेला आहे, चित्रपटाची निर्मिती अजय देवगण यांच्या एडीफ आणि भूषण कुमार यांच्या टी सिरीज ने  केली आहे. चित्रपटातील गाणी, साहस दृश्ये लढाईची दृश्ये छान टिपली आहेत, छायाचित्रण उत्तम, पार्श्वसंगीत हे चित्रपटाला पूरक असे आहे.
एकंदरीत प्रत्यकाने हि तान्हाजी ची शोर्य गाथा पहावी अशीच निर्मिती केली आहे.
दीनानाथ घारपुरे ९९३०११२९९७

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने