विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित



        धुळे, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) :  नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याच्या कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनाचे वेळी नागरिकांचे प्रश्न विभागीय स्तरावर सोडविण्यासाठी असा कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती.
विभागीय आयुक्त्‍ा राजाराम माने यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल उपायुक्त दिलीप स्वामी, उपायुक्त रघुनाथ गावडे, डॉ.अर्जुन चिखले, रमेश काळे,  तहसीलदार अनिल पुरे आदी उपस्थित होते.
शासन स्तरावर असलेल्या कामांशी संबंधीत अर्ज, निवेदने विभागीय आयुक्त कार्यालयातील  मुख्यमंत्री सचिवालय कक्षात स्विकारून क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. लोकशाही दिनाच्या दिवशी या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येईल. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याच्या कामात विभागीय स्तरावरील कक्षामुळे गतिमानता येणार असून नागरिकांना होणारा त्रासदेखील कमी होईल, असे श्री.माने यांनी यावेळी सांगितले.
 विभागाचे महसूल उपायुक्त हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असतील. तर  नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे आणि लिपिक दत्तात्रय गिते यांची नियुक्ती या कक्षासाठी करण्यात आली आहे. कक्षाचे कामकाज आजपासूनच सुरू करण्यात आले.
विभागीय स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षातर्फे जनतेकडून मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने, संदर्भ स्विकारले जातील. त्याची पोचपावती संबंधितास देण्यात येईल. अर्जावर क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अपेक्षित असलेले अर्ज विभागीय आयुक्त यांच्या नियंत्रणाखालील संबंधित  क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे त्वरीत पाठविण्यात येईल.
शासन स्तरावरून कार्यवाही होणे आवश्यक असलेल्या महत्वाच्या प्रकरणांशी संबंधित अर्ज किंवा निवेदने मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे सादर करण्यात येतील. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या अर्ज, त्यासंदर्भात झालेली कार्यवाही व प्रलंबित अर्जांची  माहिती  मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी सादर करण्यात येईल.
नागरिकांनी मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून लिहिलेले अर्ज किंवा निवेदने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात सादर करावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने