थाळनेर-भोरटेक रस्त्यावर तीन चाकी वाहनाखाली दबून तरुण ठार
थाळनेर (प्रतिनिधी) — शिरपूर तालुक्यातील थाळनेर-भोरटेक रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या तीन चाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, थाळनेर येथील ईश्वर निळकंठ कोळी (वय ४२) हे २८ मे रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास मोटरसायकलने भोरटेक गावाकडून थाळनेरकडे येत होते. त्याचवेळी मुडावाद येथील महादेवाचे दर्शन घेऊन काही महिला GJ-21-V-6857 क्रमांकाच्या तीन चाकी वाहनातून होळनांथे गावाकडे परतत होत्या.
दरम्यान, टी-पॉइंटजवळ भरधाव वेगातील तीन चाकी वाहन पाहून ईश्वर कोळी यांनी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवली होती. मात्र वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन चाकी वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहन थेट मोटरसायकलवर पलटी झाले आणि ईश्वर कोळी हे वाहनाखाली दबले गेले.
घटनास्थळी उपस्थित महिलांनी व नागरिकांनी तातडीने वाहन उचलून जखमी ईश्वर कोळी यांना बाहेर काढले. मात्र, अपघातानंतर चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. भोरटेक येथील शेतकऱ्यांनी तत्काळ मदतकार्य करत जखमीस थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
मयत ईश्वर कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व चार मुली असा परिवार आहे. रात्री तापी नदी किनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी थाळनेर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून पुढील तपास PSI भाटेवाल करीत आहेत.
