तुमचा प्रश्न... आमचा संघर्ष!” — शिरपूर फर्स्टची जनसंघर्ष यात्रा तालुकाभर धडकणार

 


“तुमचा प्रश्न... आमचा संघर्ष!” — शिरपूर फर्स्टची जनसंघर्ष यात्रा तालुकाभर धडकणार


शिरपूर | प्रतिनिधी


शिरपूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी संघर्ष उभारण्याच्या उद्देशाने “शिरपूर फर्स्ट” यांच्या वतीने भव्य जनसंघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. “तुमचा प्रश्न... आमचा संघर्ष!” या घोषवाक्याखाली निघणारी ही यात्रा तालुक्यात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


दि. 23 ते 26 मे 2026 दरम्यान ही यात्रा शिरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये फिरणार असून, 27 मे रोजी यात्रेचा समारोप शिरपूर शहरातील विविध भागांत होणार आहे. गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या प्रश्नांवर लढा उभारणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.


यात्रेदरम्यान शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्ते व पाणी समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, व्यसनमुक्ती, आरोग्य सुविधा आणि गावपातळीवरील विविध अडचणी यावर चर्चा करण्यात येणार आहे. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शिरपूर फर्स्ट ही संघटना यापूर्वीही सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत असल्याने या यात्रेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ही यात्रा कितपत प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

तालुक्यातील युवक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


दुसरीकडे मात्र युवकांच्या या सकारात्मक उपक्रमास तालुक्यातील राजकारण्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या तालुक्यात सत्तेच्या विरोधात प्रश्न विचारणे हा गुन्हा ठरत आहे, जनसामान्यांच्या प्रश्नाच्या विरोधात वाचा फोडणे देखील या तालुक्यात अपराध झाला आहे. 

त्यामुळे युवकांच्या या उपक्रमांतर्गत कोणत्याही दबाव तंत्राचा वापर न होता, जनतेच्या आवाजाला सकारात्मक दृष्टीने घ्यावे, अशी अपेक्षा होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने