खत वितरणातील अनागोंदीवर शिवसेनेचा घेराव; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
📰 सविस्तर बातमी:
धुळे (प्रतिनिधी) – खरीप हंगाम तोंडावर असताना धुळे जिल्ह्यात खतसाठा, वितरणातील अनियमितता, काळाबाजार आणि ‘लिंकिंग’ प्रथेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ४ मे) धुळे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर घेराव घालून निवेदन देण्यात आले.
यावेळी कृषी अधीक्षक अनुपस्थित असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील खत व्यवस्थेतील अनागोंदी तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
धुळे जिल्ह्यात खरीप हंगाम जवळ येत असताना खत उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी खत उपलब्ध असूनही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. शेतकऱ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून काही विक्रेते जादा दर आकारून लूट करत असल्याचे चित्र आहे.
खत खरेदी करताना शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके किंवा इतर साहित्य जबरदस्तीने घ्यायला लावले जात असल्याची ‘लिंकिंग’ प्रथा अजूनही सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. ही प्रथा बेकायदेशीर असून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानावर आघात करणारी असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील खतसाठ्याची अचूक माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्यामुळे गोंधळ आणि असंतोष वाढत आहे. याचा फायदा घेत काही ठिकाणी काळाबाजार फोफावत असल्याचा आरोप करण्यात आला.
“शेतकऱ्यांना अडचणीत टाकून कोणाच्या हितसंबंधांचे रक्षण केले जात आहे?” असा थेट सवाल करत सोनवणे यांनी प्रशासनावर निशाणा साधला. खत वितरणातील गोंधळ थांबवला नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या
जिल्ह्यातील खतसाठ्याची दररोज अद्ययावत माहिती सार्वजनिक करावी
प्रत्येक गावानुसार उपलब्ध साठ्याची माहिती PDF स्वरूपात व्हॉट्सअॅपवर द्यावी
काळाबाजार व जादा दर आकारणाऱ्यांवर विशेष पथकाद्वारे कठोर कारवाई
‘लिंकिंग’ प्रथा पूर्णपणे बंद करावी
खरीप हंगामासाठी पिकनिहाय वैज्ञानिक नियोजन
तक्रार निवारण यंत्रणा उभारून वेळेत कारवाई करावी
सोनवणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. योग्य वेळी खत उपलब्ध न झाल्यास पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. जर प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल आणि संबंधितांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
या वेळी उपजिल्हाप्रमुख भरत राजपूत, आधार बोरसे, नगराज साळुंखे, कृष्णा कोळी, रघुनाथ कोळी, भाईदास बोरसे, जितेंद्र महाजन, भगवान साळुंखे, बाबुलाल साळुंखे यांच्यासह अनेक शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यातील खत व्यवस्थेतील अनागोंदी थांबवून पारदर्शक, शिस्तबद्ध आणि शेतकरीहिताचे धोरण राबविणे ही काळाची गरज आहे. अन्यथा हा प्रश्न केवळ खतपुरवठ्यापुरता मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकतो.
