सावळदे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्न; ८२२ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

 


सावळदे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्न; ८२२ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ



शिरपूर (प्रतिनिधी) – 


महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ अंतर्गत शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे शनिवारी (१४ मार्च) समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सुमारे ८२२ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला.



या शिबिराचे उद्घाटन आमदार काशीराम पावरा, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यात सेतू शाखेमार्फत उत्पन्न व डोमिसाईल दाखले ४५५, संजय गांधी शाखेमार्फत ४७ मंजूर प्रकरणांची वाटप पत्रे, पुरवठा विभागाकडून नवीन व दुबार शिधापत्रिका ११२, तसेच ७/१२ व ८-अ उतारे ८५ लाभार्थ्यांना देण्यात आले. याशिवाय भूमी अभिलेख विभागाकडून १२ मालमत्ता पत्रक सनद, ट्रॅक्टर कृषी कर्ज ६, ७/१२ दुरुस्ती १८ आणि माती परीक्षण अहवाल २१ असे विविध लाभ वितरित करण्यात आले.



यावेळी तालुका कृषी अधिकारी कैलास गोपाळ, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच सावळदे, वाटोळे व कुरखडी येथील सरपंच उपस्थित होते.

आपल्या भाषणात आमदार काशीराम पावरा यांनी शासनाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

तहसीलदार महेंद्र माळी यांनी प्रास्ताविकात या अभियानाचा उद्देश स्पष्ट करून थाळनेर मंडळातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी थाळनेर मंडळातील तलाठी, मंडळ अधिकारी व सरपंचांनी विशेष परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने