शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करा; महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
शिरपूर (प्रतिनिधी):
भारताचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र ‘कृषी अर्थसंकल्प’ (Agriculture Budget) सादर करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शिरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
हे निवेदन प्रदेशाध्यक्ष अँड. हिरालाल परदेशी आणि अँड. संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
स्वतंत्र कृषी बजेट ही काळाची गरज
निवेदन देताना अँड. हिरालाल परदेशी म्हणाले की,
“१९२४ पासून देशात रेल्वे बजेट स्वतंत्रपणे मांडले जात होते. मात्र, देशातील मोठ्या लोकसंख्येचा आधार असलेल्या कृषी क्षेत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर झाल्यास शेतीसाठी ठोस आर्थिक तरतूद, कायदे आणि धोरणे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार होतील. यामुळे भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनेल.”
वादळी पावसाच्या नुकसानीची तत्काळ भरपाई द्या
किसान सभेने शिरपूर तालुक्यातील स्थानिक प्रश्नांवरही सरकारचे लक्ष वेधले.
दि. २७ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून विमा कंपन्यांनी व शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अँड. संतोष पाटील यांनी केली.
निवेदनातील इतर प्रमुख मागण्या
वनजमीन धारक शेतकऱ्यांना तातडीने ७/१२ उतारे देण्यात यावेत
कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरणात्मक तरतूद करण्यात यावी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी
या निवेदनामुळे शिरपूर तालुक्यातील शेतकरी प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
