शिरपूरच्या वृष्टी अग्रवालचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; ‘ज्युनिअर मिस इंडिया – मिस टॅलेंटेड’ किताब पटकावला
🗞️ सविस्तर बातमी
शिरपूर (प्रतिनिधी) –
राजस्थान राज्यातील जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर मिस इंडिया राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत शिरपूर येथील वृष्टी भूपेश अग्रवाल हिने उत्कृष्ट कामगिरी करत ‘ज्युनिअर मिस इंडिया – मिस टॅलेंटेड’ हा मानाचा किताब पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे शिरपूर शहरासह संपूर्ण तालुक्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर उजळून निघाला आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारताच्या विविध राज्यांमधून १७२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत स्पर्धकांचे केवळ बाह्य सौंदर्यच नव्हे तर बुद्धिमत्ता व विचारशक्ती, संवाद कौशल्य, आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व विकास, पोशाख व सादरीकरण, सामाजिक जाणीव व मूल्ये तसेच विविध कलागुण (टॅलेंट) या अनेक महत्त्वाच्या निकषांवर परिक्षण करण्यात आले.
या सर्व कसोट्यांवर वृष्टी अग्रवाल हिने आपली वेगळी छाप पाडत परीक्षकांची मने जिंकली आणि ‘मिस टॅलेंटेड’ हा किताब आपल्या नावावर केला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वृष्टी अग्रवाल ही शिरपूर येथील अमरीशभाई पटेल सीबीएससी स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे. ती शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे सचिव, शिरपूरची प्रख्यात व्यापारी फर्म मेसर्स ताराचंद मोतीलाल अँड कंपनीचे पार्टनर तसेच सामाजिक कार्यकर्ते भूपेश अग्रवाल यांची कन्या आहे.
तिच्या या यशाबद्दल आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम दादा पावरा, प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्ष संगीताताई देवरे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वृष्टीचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
वृष्टीच्या या यशामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, तिच्या पुढील यशासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
