एटीएम चोरांना अटक; शिरपूर शहर पोलिसांची धाडसी कामगिरी, राज्यभरात एटीएम चोरीचा मोठा कट उधळला ,धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून संपूर्ण टीमचं अभिनंदन

 




एटीएम चोरांना अटक; शिरपूर शहर पोलिसांची धाडसी कामगिरी, राज्यभरात एटीएम चोरीचा मोठा कट उधळला ,धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून संपूर्ण टीमचं अभिनंदन


📰 सविस्तर बातमी

शिरपूर (प्रतिनिधी):

शिरपूर शहरात एटीएम मशीन चोरी करण्याचा मोठा डाव शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच उधळून लावण्यात आला आहे. थरारक पाठलाग, धाडसी कारवाई आणि अचूक तपासाच्या जोरावर शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत दोन संशयित चोरट्यांना अटक करत गुन्ह्यात वापरलेले वाहन व साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे राज्यभरात सुरू असलेल्या एटीएम चोरीच्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे.

दि. 17 जानेवारी रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या शॉपिंग सेंटरमधील बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मशीनला लोखंडी साखळदंड बांधून पिकअप वाहनाच्या साहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याच्या रात्रगस्त पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तेथे संशयित आढळून आले नाहीत.

यानंतर परिसरात शोध सुरू असताना पित्रेश्वर कॉलनी स्टॉपजवळ एक महिंद्रा पिकअप संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस वाहन पाहताच संशयितांनी पिकअपमधून शहादा फाट्याकडे पलायन केले. संशयित मध्यप्रदेशाकडे जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता लक्षात घेऊन शिरपूर, थाळनेर तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेसद्वारे नाकाबंदीचे आदेश देण्यात आले.

पोलिसांच्या पाठलागादरम्यान संशयितांनी हाडाखेड येथे यू-टर्न घेत पुन्हा शिरपूरकडे वाटचाल केली. महामार्गावर उभारलेले बॅरिकेट्स उडवत ते दहिवद गावात शिरले आणि तेथून चोपडा रस्त्याने पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोरकुमार परदेशी, सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, थाळनेरचे सहायक निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलिस पथकांनी समन्वय साधत पाठलाग सुरूच ठेवला.

पोलिसांचे धाडस

चोरट्यांच्या वाहनातून सुमारे 15 ते 20 फूट लांबीचा साखळदंड रस्त्यावर ओढत नेला जात होता. जीवाची पर्वा न करता पोलिसांनी आपल्या वाहनाचे टायर त्या साखळदंडावर चालवून चोरट्यांच्या वाहनाचा वेग कमी केला. सुटण्याची शक्यता नसल्याचे लक्षात येताच संशयितांनी धावत्या वाहनातून उडी घेतली. पिकअप वाहन एका शेतात अडकल्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. रात्रीच्या अंधारामुळे संशयित तात्काळ सापडले नाहीत; मात्र सुमारे 45 मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर पोलिसांनी वाहन जप्त केले.

तपासातून धक्कादायक माहिती

वाहनाच्या नंबर प्लेटवर चिखल फासून ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तांत्रिक तपासाअंती सदर वाहन मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले. निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी स्वतंत्र पथके तयार करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर संशयित हेमंत सुकलाल माळी (वय 21, रा. भिरडई, ता. धुळे) व विदूर ऊर्फ विजय देवा जाधव (वय 40, रा. वसंत नगर, ता. पारोळा, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली.

यूट्यूबवरून घेतले प्रशिक्षण

संशयितांनी यूट्यूबवर एटीएम मशीन चोरीचे व्हिडिओ पाहून प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यासाठी त्यांनी 9 जानेवारी रोजी पिकअप वाहन खरेदी केले, भंगार बाजारातून साखळदंड व अन्य साहित्य जमा केले. यापूर्वी धुळे येथील पंजाब नॅशनल बँक व अमळनेर येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम चोरीचे प्रयत्न त्यांनी केले होते. मात्र दोरीचा वापर केल्याने ते अयशस्वी ठरले. त्यामुळे शिरपूरमध्ये साखळदंडाचा वापर करण्यात आला.

राज्यव्यापी नेटवर्कचा कट

संशयितांनी राज्यातील अन्य गुन्हेगारांशी संपर्क साधून एटीएम मशीन चोरीचे मोठे नेटवर्क उभारण्याचा कट रचल्याचेही तपासात उघड झाले आहे. शिरपूर शहरातील बहुतांश एटीएमची रेकी करून साईट मॅप तयार करण्यात आला होता. संशयितांकडून आणखी गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांच्यासह उपनिरीक्षक संदीप दरवडे, हवालदार व पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने