पक्षांतरावर मतदारांचा बुलडोझर! ‘आयाराम-गयारामां’ना धुळेकरांचा ठाम नकार
धुळे प्रतिनिधी -
धुळे महापालिका निवडणुकीत मतदारांनी यावेळी केवळ उमेदवार नव्हे, तर सोयीच्या राजकारणालाच मतपेटीतून धक्का दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून मैदानात उतरलेल्या १४ उमेदवारांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारत ‘आयाराम–गयाराम’ राजकारणाला चपराक दिली आहे.
निवडणुकीपूर्व काळात एकूण २३ नेत्यांनी पक्ष बदलून नवे राजकीय झेंडे हाती घेतले होते. मात्र त्यापैकी केवळ ९ उमेदवारांनाच विजय मिळवता आला, तर उर्वरित १४ जणांना पराभवाचा दणका बसला. सत्तेच्या जवळ जाण्याची घाई आणि स्वार्थासाठी पक्ष बदलण्याची मानसिकता मतदारांना मान्य नसल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, कमी कालावधीत नवीन पक्षाचे चिन्ह, विचारधारा आणि भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यात हे उमेदवार अपयशी ठरले. अनेक प्रभागांमध्ये मतदारांनी “कालपर्यंत विरोधात असलेले आज आपल्याच बाजूचे कसे?” असा थेट सवाल उपस्थित केला. परिणामी विश्वासघाताची भावना पराभवात रूपांतरित झाली.
या निकालाने एक महत्त्वाचा राजकीय संदेश दिला आहे — मतदार आज जागरूक आहे. पक्षांतर करून केवळ विजय मिळवता येतो, ही गैरसमजूत धुळेकरांनी मोडीत काढली आहे. सत्ता, पद आणि सोयीसाठी रंग बदलणाऱ्या नेत्यांना मतदार आता माफ करायला तयार नाहीत, हेच या निवडणुकीचे खरे राजकीय भाष्य ठरत आहे.
