शिरपूर तालुक्यातील कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करा - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन

 


शिरपूर तालुक्यातील कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करा - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन


शिरपूर प्रतिनिधी - 


 शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचा कारभार काही कामचुकार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांमुळे ठप्प होत असून, संघटनेमार्फत अवास्तव दबाव निर्माण करून प्रशासकीय कामात खोळंबा निर्माण करून सामान्य नागरिकांना होणाऱ्या प्रचंड त्रासाबाबत तातडीने चौकशी करून कडक कारवाई करण्याबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून जिल्हाधिकारी धुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना निवेदन देण्यात आले.


विशेष म्हणजे सध्या तालुक्यातील ग्रामसेवक हे संघटनेमार्फत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करत असून, सध्या त्यांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, प्रशासकीय बैठकींवर देखील बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे अन्याय ग्रामसेवकांवर होत आहे की सामान्य नागरिकांवर हा प्रश्न उपस्थित होत आहे.


या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,

शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायती या ग्रामीण विकासाचा कणा मानल्या जातात. मात्र आज याच ग्रामपंचायतींचा कारभार काही बेजबाबदार, कामचुकार आणि कर्तव्यविसर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांमुळे अक्षरशः कोलमडलेला आहे. याचा थेट फटका सामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांना बसत असून शासनाच्या योजनांचा उद्देशच अपयशी ठरत आहे.


एकीकडे प्रशासन शिस्त व पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे काही कर्मचारी संघटना अवास्तव दबाव, निवेदने, आंदोलने व असहकार आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाला वेठीस धरत आहेत. शिस्त पाळण्याऐवजी अधिकारांचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव टाकण्याची ही प्रवृत्ती लोकशाही व सुशासनाच्या मुळावर घाव घालणारी आहे.


तालुक्यातील वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. काही अपवाद वगळता अनेक ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांबाबत नागरिक व प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. गावाच्या प्रशासनाचा मेरुदंड मानले जाणारे हे अधिकारी प्रत्यक्षात मात्र पुढील प्रकारे कामचुकारपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे :


सलग ७–८ दिवस ग्रामपंचायत कार्यालयात अनुपस्थित राहणे


साध्या दाखल्यांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या मारायला लावणे


मुख्यालयी वास्तव्यास न राहता घरभाडे भत्ता उकळणे


आठवड्यातून केवळ १–२ दिवस कार्यालयात हजर राहून उर्वरित कारभार घरून चालवणे


लेखापरीक्षण अहवालांच्या प्रती कार्यालयात उपलब्ध नसणे.


कामात जाणीवपूर्वक दिरंगाई व फाईल-दप्तर वेळेवर न करणे.


नागरिकांशी उर्मट, उद्धट व अपमानास्पद वर्तन करणे


ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना वेळेवर उपस्थित न राहणे.


वेळेत मासिक सभा न घेणे, 


मासिक सभेचे इतिवृत्त दरमहा सादर न करणे


मासिक दैनंदिन अहवाल वेळेवर सादर न करणे


कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात हजर न राहणे


ग्रामनिधी बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च करणे, अनावश्यक खर्च करणे,


घरकुल योजनेच्या शेवटच्या हप्त्यासाठी आवश्यक स्वाक्षरी वेळेवर न देणे, परिणामी लाभार्थ्यांचे हप्ते रखडणे. अशा अनेक प्रकारचे अनियमितता काही ग्रामसेवकांकडून केली जात आहे.


वरील प्रकार हे केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचे नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या हक्कांवर थेट अन्याय करणारे आहेत. शासनाच्या योजना कागदावरच राहाव्यात आणि नागरिकांनी सतत कार्यालयांचे उंबरठे झिजवावेत, अशीच या कामचुकार अधिकाऱ्यांची मानसिकता असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

तरी आम्ही शिरपूर तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या वतीने मागणी करीत आहोत की,सर्व तक्रारींची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.


दोषी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात यावी.

ग्रामपंचायत कार्यालयातील उपस्थिती, कामकाज व निधी वापरावर कडक नियंत्रण ठेवण्यात यावे.

नागरिकांना वेळेत व सुलभ सेवा मिळेल, याची प्रभावी यंत्रणा उभी करण्यात यावी.


जर याबाबत तातडीने ठोस कार्यवाही झाली नाही, तर सामान्य नागरिकांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देखील भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने