शिरपूरमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; नागरिक–पोलीस सतर्कतेचे उदाहरण
🗞️ सविस्तर बातमी
शिरपूर प्रतिनिधी –
शिरपूर शहरात नागरिकांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात यश आले आहे. शहरातील कॉटेज हॉस्पिटलजवळील बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मशीनवर मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात संशयितांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाईकाला हा प्रकार संशयास्पद वाटला त्याने तात्काळ शहर पोलीस ठाण्याला सुचित केले.
नागरिकांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार वेळेत उघडकीस आला आणि मोठा अनर्थ टळला.
पोलिसांची सतर्कता आणि चाहूल आणि
नागरिकांचा वाढता पाठलाग आणि गोंधळ पाहून संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.
पाठलागादरम्यान संशयित जवळच्या शेतात फरार झाले, मात्र घटनास्थळी वापरण्यात आलेले पिकअप वाहन तेथेच सोडून दिले.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस व नागरिकांनी संयुक्तपणे परिसराची पाहणी करत संशयितांचा पाठलाग सुरू ठेवला. दरम्यान संशयितांनी पळवलेले पिकअप वाहन भोरखेडा येथील गोदी फाट्याजवळ पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत जयपाल राजपूत, अनिल राजपूत, प्रीतम राजपूत व भूपेंद्र राजपूत यांनी नागरिक म्हणून महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
पोलिसांनी तात्काळ परिसरात नाकाबंदी करत फरार संशयितांचा शोध सुरू केला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनाची कसून तपासणी सुरू असून, त्याच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे एटीएम चोरीचा डाव हाणून पाडता आला असून, शिरपूर पोलिसांनी नागरिकांचे विशेष कौतुक केले आहे. या प्रकरणी पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करत आहेत.
