शिरपूर बसस्थानकात हातचलाखीने चोरी करणारा आरोपी ४ तासांत जेरबंद
शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या खिशातून पैसे चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या चार तासांत जेरबंद करून त्याच्याकडून रोख रक्कम हस्तगत केली आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनला प्रवाशाच्या खिशातून ५० हजारांची चोरी केल्याची फिर्याद किशोर फकीरा मोरे राहणार कुरखळी तालुका शिरपूर यांनी दिली होती. दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ते शिरपूर बसस्थानक येथे शिरपूर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. त्यावेळी प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाचा, डोक्यावर कॅप आणि काळ्या-निळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या एका अनोळखी इसमाने हातचलाखीने त्यांच्या पँटच्या उजव्या खिशातील रोख ५०,००० रुपये चोरून नेले.
गुप्त बातमीदारा मार्फत आरोपीचा शोध
या घटनेनंतर पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवली.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित इसम खंडेराव मंदिर परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन त्या व्यक्तीस ताब्यात घेतले.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने आपले नाव राजु पोपट सैंदाणे वय ६२, राहणार वाघाडी, तालुका शिरपूर असे सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून ४०० रुपयांच्या १०० नोटा अशा एकूण ५०,००० रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत.
सदर आरोपीकडे अधिकचा तपास सुरू असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सोनवणे करीत आहेत.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी तसेच डी.बी. पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे, चेतन सोनवणे, अनिल जाधव, रविंद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, भटू साळंके, सोमा ठाकरे, प्रशांत पवार, मनोज महाजन, सचिन वाघ, आरिफ तडवी आदींनी संयुक्तरित्या ही उल्लेखनीय कामगिरी केली.
