खानदेशच्या मातीतून उगवलेला यशाचा सूर्य
चंद्रकांत पाटील यांचा गौरव म्हणजे खानदेशच्या स्वाभिमानाचा सन्मान!
लेख – महेंद्रसिंह राजपूत, संपादक – निर्भीड विचार
आजचा दिवस केवळ एका पुरस्काराचा नाही…
आजचा दिवस आहे संघर्षाला सलाम करण्याचा…
आजचा दिवस आहे मेहनतीच्या विजयाचा…
आजचा दिवस आहे खानदेशच्या भूमिपुत्राच्या स्वप्नांना मिळालेल्या पंखांचा…
खानदेशच्या मातीने नेहमीच जिद्दी माणसं घडवली आहेत. या मातीत जन्मलेला प्रत्येक माणूस संघर्षाला आपला सोबती मानतो आणि मेहनतीला आपलं शस्त्र. अशाच संघर्षातून घडलेलं, शून्यातून विश्व उभं करणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे चंद्रकांत धोंडू पाटील.
त्यांना मिळालेला महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड – 2025 हा फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही…
हा सन्मान आहे एका खानदेशच्या स्वाभिमानाचा…
हा गौरव आहे एका सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाचा…
हा पुरस्कार आहे त्या हातांचा, ज्यांनी कष्टाने यशाची इमारत उभी केली. चंद्रकांत पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे प्रेरणेचा महासागर आहे. अत्यंत साध्या कुटुंबात जन्म, बालपणात गरिबीचे चटके, परिस्थितीची सततची परीक्षा… पण या सगळ्यावर मात करत त्यांनी आपल्या इच्छाशक्तीने आकाशालाही गवसणी घातली.
एकेकाळी मेडिकल स्टोअरमध्ये मदतनीस म्हणून काम करणारा हा तरुण, उधारीत पैसे घेऊन पहिला कॅमेरा विकत घेतो आणि फोटोग्राफीच्या छोट्याशा व्यवसायातून आपल्या स्वप्नांची सुरुवात करतो.
ही सुरुवात होती… पण शेवट नव्हता.
कारण चंद्रकांत पाटील हे थांबणारे नव्हते.
फोटोग्राफीसोबत त्यांनी मंडप व्यवसायाची जोड दिली. संगीताची आवड त्यांनी “सम्राट ऑर्केस्ट्रा”च्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवली. आणि पुढे सुरू झाला सम्राट ग्रुप नावाचा यशाचा भव्य अध्याय.
सम्राट साऊंड आणि मंडप व्यवसायाने पाहता पाहता वटवृक्षाचं रूप घेतलं. अत्याधुनिक साहित्य, कलात्मक सजावट, आकर्षक देखावे आणि दर्जेदार सेवा यामुळे ते केवळ खानदेशातच नव्हे, तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले.
या प्रवासात त्यांनी केवळ स्वतःचा व्यवसाय वाढवला नाही, तर शेकडो हातांना रोजगार देऊन अनेक घरांमध्ये चूल पेटवली. हीच खरी उद्योजकता असते…
स्वतः उभं राहणं आणि इतरांनाही उभं करणं.
मैत्रीचा सन्मान, माणुसकीची जपणूक
यशाच्या शिखरावर पोहोचूनही चंद्रकांत पाटील यांनी आपली माणुसकी, आपली मैत्री आणि आपले संस्कार कधीच विसरले नाहीत.ज्यांनी सुरुवातीला साथ दिली, ते मित्र आजही त्यांच्या सोबत आहेत.
कारण त्यांनी फक्त व्यवसाय नाही वाढवला…
त्यांनी नाती जपली…मैत्री जपली…माणुसकी जपली.
व्यवसायात यश मिळाल्यानंतर त्यांनी समाजाचे ऋण मान्य केले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी गावासाठी काम केलं, सरपंचपद भूषवत समाजसेवेचा वसा घेतला.
त्यांचं यश हे स्वतःपुरतं मर्यादित नाही…
त्यांचं यश हे समाजासाठी, गावासाठी, खानदेशासाठी आहे.पुरस्कार नाही… हा खानदेशचा गौरव!
आज आयोजकांनी एका खऱ्या हिऱ्याचा शोध घेतला आणि महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड – 2025 चंद्रकांत पाटील यांना प्रदान करून खानदेशचा गौरव अधिक उजळून टाकला.
त्यांच्या सन्मानामुळे आज शिरपूर तालुक्याचं नाव राज्यभरात अभिमानाने घेतलं जात आहे.
माझे मित्र, बालपणाचे सहकारी चंद्रकांत पाटील,
आपणास मिळालेल्या या सन्मानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
आपण यशाच्या प्रत्येक पायरीवर अधिक जोमाने चढत राहाल…नवीन शिखरं गाठाल…आपलं कर्तृत्व आकाशाला गवसणी घालेल…पण आपले पाय जमिनीवर राहतील,आणि आपली नाळ सामान्य माणसाशी कायम जोडलेली राहील…हीच सदिच्छा!
खानदेशच्या या भूमिपुत्राचा गौरव म्हणजे प्रत्येक संघर्ष करणाऱ्या तरुणासाठी प्रेरणा आहे.
पुन्हा एकदा…खूप खूप अभिनंदन चंद्रकांत पाटील!
