तामथरे येथे साकारतंय भक्ती-प्रेमाचं दिव्य केंद्र! ‘श्री राधाकृष्ण प्रेम मंदिरा’साठी २४ जानेवारीला शिरपूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक
शिरपूर (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील तामथरे (ता. शिंदखेडा) येथे उभारण्यात येत असलेले भव्य व दिव्य भगवान श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर हे केवळ मंदिर न राहता, भक्ती, प्रेम व आध्यात्मिक ऊर्जेचे एक महान केंद्र ठरणार आहे. या पवित्र मंदिर उभारणीच्या कार्याला अधिक सुस्पष्ट दिशा देण्यासाठी दि. २४ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी सायंकाळी ४ वाजता शिरपूर येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक स्व. इंद्रसिंग भाऊसाहेब हॉल, वरझडी रोड, शिरपूर येथे पार पडणार असून, मंदिर बांधकाम कमिटी व शिरपूर तालुक्यासह परिसरातील तमाम भगवान श्रीकृष्णांचे भाविक भक्त या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
ही बैठक श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान, तामथरे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून, परमपूज्य संत श्री महेंद्रजी महाराज यांच्या पावन अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होणार आहे. यावेळी गुजरात येथील नामांकित उद्योजक श्री रविशेठ सुरत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
भगवान श्री राधाकृष्ण यांच्या प्रेम, भक्ती व अध्यात्माने ओतप्रोत असलेले हे मंदिर भविष्यात हजारो भाविकांसाठी श्रद्धा, साधना आणि सांस्कृतिक वारशाचे केंद्र ठरेल. मंदिर उभारणीच्या पुढील टप्प्यांबाबतचे नियोजन, विकास आराखडा, भाविकांचा सहभाग, देणगी व सेवाकार्य यासंबंधी सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे. तसेच भाविकांकडून मिळणाऱ्या सूचना व मार्गदर्शनालाही विशेष महत्त्व दिले जाणार आहे.
या दैवी व सामाजिक कार्यात शिरपूर तालुक्यासह परिसरातील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, विविध भक्त मंडळे व श्रीकृष्णप्रेमी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
भगवान श्री राधाकृष्ण यांच्या प्रेमतत्त्वावर आधारित हे मंदिर समाजात भक्ती, सद्भावना व अध्यात्मिक मूल्ये रुजवणारे ठरणार असून, या पवित्र कार्यात सहभागी होणे ही प्रत्येक भाविकासाठी एक सुवर्णसंधी असल्याचेही आयोजकांनी नमूद केले आहे.
