जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ९ हजारांची लाच! धुळे जात पडताळणी समितीतील प्रकल्प सहायक रंगेहात अटकेत

 



जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ९ हजारांची लाच! धुळे जात पडताळणी समितीतील प्रकल्प सहायक रंगेहात अटकेत


📰 सविस्तर बातमी

धुळे | प्रतिनिधी

धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), धुळे यांनी केलेल्या सापळा कारवाईत प्रकल्प सहायक इम्रान अब्दुल रशिद अन्सारी (वय ४२) याला ९,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कनिष्ठ लिपीक प्रमोद रामराव पाटील (वय ४५) याचाही सहभाग असून त्याच्याविरोधातही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी आपल्या शालकाच्या ओबीसी जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी होण्यासाठी दि. २१ जुलै २०२५ रोजी ऑनलाईन अर्ज करून सर्व आवश्यक कागदपत्रे जिल्हा जात पडताळणी समिती, धुळे येथे सादर केली होती. सुनावणीदरम्यान आवश्यक ती कागदपत्रेही समितीकडे जमा करण्यात आली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने तक्रारदार सातत्याने कार्यालयात पाठपुरावा करत होते.

दरम्यान, प्रकल्प सहायक इम्रान अन्सारी यांनी जात पडताळणीचे काम करून देण्यासाठी १२,००० रुपयांची लाचेची मागणी केली. त्यापैकी ३,००० रुपये फोनपेच्या माध्यमातून स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले. तरीही काम न झाल्याने तक्रारदार पुन्हा कार्यालयात गेले असता, कनिष्ठ लिपीक प्रमोद पाटील यांनी स्पष्ट शब्दांत “पैशांशिवाय काम होणार नाही” असे सांगत १०,००० रुपयांची मागणी केली.

या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली. दि. ८ जानेवारी २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता, तडजोडीअंती ९,००० रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरले, तसेच या मागणीस प्रमोद पाटील याने अपप्रेरणा दिल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली. यावेळी इम्रान अन्सारी याने तक्रारदाराकडून ९,००० रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी केले असून, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, तर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल आहेत. या यशस्वी कारवाईत ACB धुळेच्या सापळा पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय, निमशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ ACB धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा.

“लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे – आपल्या सेवेशी सदैव तत्पर” असे आवाहनही करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने