"शिरपूरमध्ये थरारक एटीएम फोडी! — पोलिसांशी चकमकीनंतर दरोडेखोर फरार, लाखोंची रोकड लंपास"
📍शिरपूर प्रतिनिधी | निर्भीड विचार
शहरातील अंबिकानगर परिसरात शनिवारी (25 ऑक्टोबर) मध्यरात्री दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एसबीआय बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांचा पाठलाग करताना चकमकीचा थरार घडला, मात्र दरोडेखोर कार आणि रोकडसह पसार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास अल्टो कारमधून आलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी अंबिकानगर येथील एसबीआय एटीएमवर धाड टाकली. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून रोकड काढली. दरम्यान, परिसरातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखत धमकी दिली.
नागरिकांनी तत्काळ शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिजासन घाट परिसरापर्यंत पोलिसांनी संशयितांचा पाठलाग केला, मात्र दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी घटनास्थळी पाहणी केली. फॉरेन्सिक टीम व डॉग स्कॉडलाही तात्काळ पाचारण करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथकाने संशयितांच्या शोधासाठी मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
या धाडसी फोडीमुळे शिरपूर शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.
