*लेख : ९ सप्टेंबर - शहीद दिन*
*बाल क्रांतिकारक - शिरीषकुमार मेहता*लेखक - रणवीरसिंह राजपूत,नंदुरबार/ठाणे*
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवून ब्रिटिश साम्राज्याला सज्जड आव्हान देणारं परखड व जहाल व्यक्तिमत्व कोणतं तर,ते *बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता* होय.अशा महान बाल क्रांतीवीर शिरीषकुमार मेहता यांचा जन्म नंदराजाच्या नंदुरबारनगरीत झाला अन् जणू देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा अभिषेक करणारा देशभक्त बाल क्रांतीवीर उदयास आला.
महाराष्ट्रातील खान्देश अन् खानदेशातील *नंदुरबार* हे ऐतिहासिक शहर साऱ्या देशात क्रांतीवीर शिरीषकुमार मेहता यांच्या नावाने ओळखले जाते.इतकेच नव्हे तर,या शहराला अन्य १०६ स्वातंत्र्य सैनिकांचाही वारसा लाभला आहे.शिरीषकुमार यांचे वडील पुष्पेंद्रभाई मेहता आणि आई सविताबेन यांच्या रोमा रोमात देशभक्तीचे वारे संचारले होते.*महात्मा गांधी* यांनी ज्यावेळी *दांडीयात्रा* काढली होती,त्यावेळी पुष्पेद्रभाई अन् त्यांचे भाऊ सोमनाथभाई हे आघाडीवर होते.*जेथे राघव..तेथे सीता* या भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार पुष्पेद्रभाई अन् सविताबेन हे खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य लढ्यात उतरले. सविताबेन ह्या राष्ट्र सेवादलाच्या अध्यक्षा तर,काँग्रेस कमिटीची धुरा पुष्पेद्रभाईंकडे सोपविलेली होती.उल्लेखनीय बाब म्हणजे मेहता दांपत्याने आपलं सारं आयुष्य देशसेवेला वाहून घेतलं.
तात्पर्य,शिरीषकुमारचे घर म्हणजे जणू क्रांतीचं मंदिरच.या पवित्र वास्तूत क्रांतिकारकांच्या बैठका,
चर्चासत्रे,विचारांचे आदानप्रदान होऊन जनआंदोलनाची दिशा ठरत असे.भारतीय तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची बिजे रोवण्यासाठी पुष्पेंद्रभाई आपल्या घरात क्रांतिकारकांची भाषणे ठेवीत असत.अशा क्रांतीमय वातावरणात छोट्या क्रांतीवीर शिरीषकुमारची जडणघडण झाली."मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" ही उक्ती शिरीषकुमारच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली.
देशसेवेचा वारसा लाभलेल्या शिरीषच्या नसा नसात
देशभक्तीचे संस्कार भिनले होते.लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या *गीतारहस्य* ग्रंथाला शिरीषने जीवनग्रंथ मानला होता.अशा महान बाल क्रांतिकारकांना आम्हा मराठी भूमिपुत्रांचा मानाचा मुजरा!
महात्मा गांधींनी फिरंग्यांना *भारत छोडो* चा इशारा दिला असता,नंदुरबार शहरात क्रांतीचा अंगार फुटला होता.बालवीर शिरीषकुमारच्या नेतृत्वाखाली निघालेल्या प्रभातफेरीत *वंदे मातरम्,इंकलाब जिंदाबाद,भारत माता की जय,भारत छोडो* या गगनभेदी घोषणांनी सारं नंदुरबार शहर दुमदुमून गेलं होतं.हे आक्राळविक्राळ
जनआंदोलनाचे स्वरूप पाहून,इंग्रजांचे पोलीस पार हादरून गेले होते.लाठीमार करूनही आंदोलक पांगत नव्हते.त्यामुळे गोऱ्या शिपायांचा क्रोध अनावर झाला होता.यावर उपाय म्हणून इंग्रज सैनिकांनी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर सशस्त्र परेड सुरू केली.जमाव हाताबाहेर जातोय हे पाहून इंग्रज सैनिकांनी प्रमुख नेत्यांची धरपकड केली.
"झेंडा दे..नाही तर गोळी झाडू" अशी चेतावणी इंग्रज सैनिकांनी शिरीषकुमार अन् त्यांच्या बालमित्रांना दिली.परंतु त्याला भीक न घालता,शिरीषकुमार अन् आंदोलकांनी तिरंगा देण्यास सफशेल नकार दिला.परिणामी,क्रोधापोटी इंग्रज सैनिकांनी आंदोलकांच्या दिशेने अंधाधुंद फैरी झाडल्या. इतकेच नव्हे तर,त्यांनी प्रभातफेरीतील मुलींवर गोळ्या
झाडण्यासाठी बंदुका ताणल्या.हे दुष्कृत्य पाहून शिरीषकुमारला भयंकर राग आला,अन् तो सैनिकांना उद्देशून क्रोधाने म्हणाला " "भित्र्या..भ्याड नामर्दांनो,मुलींवर काय बंदुका ताणतात,ही पहा माझी छाती,हिंमत असेल तर चालवा गोळी" या चेतावणीने आधीच चवताळलेल्या शिपायांनी शिरीषच्या दिशेने गोळ्या झाडल्या.क्षणातच गोळी लागून शिरीषच्या छातीतून रक्ताची चिरकांडी उडाली.रक्ताच्या थारोळ्यात शिरीष पडला.
तथापि,त्याने हातातून तिरंगा खाली पडू दिला नाही.तो झेंडा त्याने कसाबसा त्याचा वर्गमित्र *लालदास* कडे दिला.परंतु शिरीषसह तो पण शिपायांच्या गोळीने धारातिर्थी पडला.नंतर तोच तिरंगा *शशिधर* कडे देण्यात आला,तोही शिपायांच्या गोळीने शहीद झाला.त्या पाठोपाठ *घनश्यामदास* याने तो झेंडा घट्ट पकडुन "इंकलाब जिंदाबाद,भारत माता की जय" असा जयघोष केला,परंतु अखेर तोदेखील ब्रिटिश सैनिकांच्या गोळीने मातृभूमीसाठी शहीद झाला.अखेर तो झेंडा *धनसुखलाल* याने फिरंग्यांच्या सैनिकांची गोळी शरीराला छेदून जाण्याआधीच आपल्या हातातील तिरंगा भारताच्या पवित्र भूमीत रोवला.अन् इंकलाब जिंदाबाद,भारत माता की जय या घोषणा देत हा बाल क्रांतीवीर क्षणातच गोळी लागून जमिनीवर कोसळला.देशाच्या स्वातंत्र्यासाठी या नंदनगरीतील पंचरत्न बाल क्रांतीवीरांनी ९ सप्टेंबर १९४२ रोजी आपल्या प्राणांची आहुती दिली.शिरीषकुमारसह अन्य चार बाल क्रांतिकारकांनी स्वराज्यासाठी दिलेलं महान बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं.म्हणून हा दिवस *शहीद दिन* म्हणून मानला जातो.
शहीद शिरीषकुमार अन् अन्य चार
बालक्रांतिकारकांच्या स्मरणार्थ नंदुरबार येथील माणिक चौकात भव्यदिव्य स्मारक उभारण्यात आले आहे.या घटनेनंतर *साने गुरुजी* यांनी शिरीषकुमारच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांचे सांत्वन करत,त्याच्या बलिदानाला स्याल्युट केले अन्
*लहानग्याची मोठी सावली* या शब्दात त्यांनी स्व.शिरीषकुमारच्या देशभक्तीची प्रशंसा केली.या पंचरत्न बाल
क्रांतीवीरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन भारतीय युवकांनी आपल्या
हिंदुस्थानाला सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी योगदान द्यावे,म्हणजे हीच त्यांच्या महान बलिदानाला खरी मानवंदना ठरेल.
भारत🚩माता की जय!
जय🇨🇮हिंद !
जय🏹महाराष्ट्र!
