शिरपूर, जि. धुळे (दि. ७ ऑगस्ट २०२५) — शिरपूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले धिरज संजय भामरे (तांत्रिक सहायक, रोहयो) यांनी एका शेतकऱ्याला देण्यात आलेल्या विहिरीच्या अनुदानाच्या मोबदल्यात ₹२,o ००/- लाच मागितल्याच्या गंभीर आरोपाखाली आज रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने सापळा रचून यशस्वीरित्या पार पाडली.
सदर प्रकरणात मूळ तक्रारदार हे मौजे वकवाड, ता. शिरपूर येथील रहिवासी असून त्यांना २०२३–२४ मध्ये रोजगार हमी योजनेतून विहीर खोदकामासाठी ₹४,००,०००/- चे अनुदान मंजूर झाले होते. यापैकी ₹५०,०००/- रक्कम आधीच प्राप्त झाली असून उर्वरित ₹२,५०,०००/- रक्कम मिळवण्यासाठी तक्रारदारांनी पंचायत समितीत तांत्रिक सहायक धिरज भामरे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान भामरे यांनी उर्वरित अनुदान मंजुरीसाठी आणि आधी दिलेल्या रकमेच्या मोबदल्यात ₹२,o ००/- लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे दिनांक १९.०५.२०२५ रोजी तक्रार दाखल केली.
दि. ०७ ऑगस्ट २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. पंचायत समिती कार्यालयात तक्रारदाराकडून मागितलेली रक्कम सौरभ राजेंद्र ठाकरे (तांत्रिक सहायक) यांच्यामार्फत स्विकारताना धिरज भामरे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस
अधीक्षक श्री भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री माधव रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली
लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पदमावती कलाल, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदिश बडगुजर यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
