शिरपूरच्या काकडमाडमध्ये शिक्षणाचे मंदिर कोसळले; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी ग्रामीण शिक्षण

 



शिरपूरच्या काकडमाडमध्ये शिक्षणाचे मंदिर कोसळले; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी ग्रामीण शिक्षण


शिरपूर (ता. प्रतिनिधी) :


शिरपूर तालुक्यातील दुर्गम काकडमाड गावातील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारतीच्या काही भाग मुसळधार पावसात कोसळून पडली. सुदैवाने विद्यार्थी शाळेत नसल्यामुळे मोठा अपघात टळला, मात्र या घटनेमुळे तालुक्यातील ग्रामीण शिक्षणाची भयावह वास्तविकता पुन्हा एकदा उघड झाली आहे.


गावकऱ्यांनी तसेच शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून  शिक्षण विभाग व प्रशासन यांच्याकडे वारंवार निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली होती. केवळ आठ दिवसांपूर्वीही निवेदन देण्यात आले होते, तरीही शिक्षण विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींनी हलगर्जीपणा केला. परिणामी, तीस वर्षे जुनी शाळा इमारतीच्या काही भाग आज कोसळून गावातील शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


एकीकडे शिरपूर तालुक्याला “शिक्षणाची पंढरी” म्हटले जाते, खाजगी शिक्षण संस्थांच्या गगनाला भिडणाऱ्या इमारती उभ्या राहत आहेत; तर दुसरीकडे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा अक्षरशः कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहेत. हा विरोधाभास केवळ दुर्दैवीच नाही, तर प्रशासनाची आणि राजकीय दुर्लक्षाची जाणीव करून देणारा आहे.


शैक्षणिक ध्येयधोरणांमध्ये ‘समान व दर्जेदार शिक्षण’ हा गजर केला जातो. मात्र जमिनीवरचे वास्तव वेगळे आहे. ग्रामीण मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्याऐवजी त्यांच्या डोक्यावरची छप्परंही प्रशासन जपण्यात अपयशी ठरत आहे.


शाळा कोसळली हे केवळ इमारतीचे नुकसान नाही, तर ते ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या ढासळत्या पायाची जाणीव करून देणारे कटू वास्तव आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने