💥 लाच घेताना जिल्हा समन्वयक रंगेहात अडकला! ५,००० रुपयांच्या लाचेप्रकरणी शुभम भिका देववर गुन्हा दाखल – धुळे लाचलुचपत विभागाची कारवाई





 💥 लाच घेताना जिल्हा समन्वयक रंगेहात अडकला!

५,००० रुपयांच्या लाचेप्रकरणी शुभम भिका देववर गुन्हा दाखल – धुळे लाचलुचपत विभागाची कारवाई


धुळे | प्रतिनिधी

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे धुळे जिल्हा समन्वयक शुभम भिका देव याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तक्रारदाराकडून “वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना” अंतर्गत मंजूर झालेल्या कर्जाच्या व्याजाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी भिका देव याने पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

तक्रारदाराने इंडसइंड बँकेतून २४,९६,००० रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेऊन जेसीबी खरेदी केली होती. योजनेनुसार, कर्जाच्या व्याजाची रक्कम महामंडळाकडून परत मिळण्यास पात्र होते. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह तक्रारदाराने दि. १४ जुलै २०२५ रोजी भिका देव यांची भेट घेतली. त्यावेळी समन्वयक भिका देव याने प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाची तक्रार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली. त्यानंतर दि. १६ जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी करून धुळे शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर पथकाने भिका देव याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास करण्यात येत आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्यासह राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींचा समावेश होता.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने