शरद पवारांचा ‘राजकीय गुगली’; राष्ट्रवादी विलीनीकरणाचा निर्णय पुढच्या पिढीकडे!
सुप्रिया सुळे पुन्हा अजितदादांसोबत जाणार?
पुणे:
राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादळ पुन्हा एकदा शमण्याऐवजी गडद होताना दिसत आहे. वरिष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना पक्षाच्या विलीनीकरणाचा निर्णय ‘पुढच्या पिढीकडे’ सोपवला असून, त्याच वेळी दोन्ही गटांतील विचारधारा एकसारखी असल्याचेही सूचित केले. त्यामुळे आता सुप्रिया सुळे पुन्हा अजित पवार गटात जाणार का? या प्रश्नावर राजकीय वर्तुळात उलथापालथ माजली आहे.
“होय, काहींना पुन्हा एकत्र यावंसं वाटतंय. विचारधारा सारखी असल्यामुळे विलीनीकरण शक्य आहे. मी निर्णय प्रक्रियेत नाही, तो पुढच्या नेतृत्वाने घ्यावा,” – शरद पवार
या वक्तव्यानंतर पवार गटातील अनेक नेते संभ्रमात पडले असून, घरातीलच राजकारण पुन्हा एकत्र येणार की नाही यावर राजकीय भाकितं लावली जात आहेत. छगन भुजबळ यांनी यावर आनंद व्यक्त केला असला, तरी काही अजितदादा समर्थक नेत्यांना "इगो" अडथळा ठरेल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
दरम्यान, अजित पवार सध्या भाजपसोबत युतीत असून, त्यांच्याच गटात सुप्रिया सुळे सामील होणार का, यावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. हा निर्णय सुळे स्वतः घेतील, अशी भूमिका शरद पवारांनी घेतल्याने, सुळे यांच्यासमोर मोठं राजकीय द्विधा निर्माण झालं आहे.
राजकीय तळातळाची ही हालचाल केवळ राष्ट्रवादी काँग्रेसपुरती मर्यादित न राहता, राज्यातील समग्र राजकीय समीकरणांना हादरा देणारी ठरू शकते. त्यामुळे ‘पवार घराणं’ राजकीयदृष्ट्या पुन्हा एकत्र येणार का? की पुन्हा नवा फाटाफुटीचा अध्याय लिहिला जाणार? यावर सगळ्यांचे लक्ष आहे.
