घरकुल लाभार्थ्यांना दिलासा : शिरपूर तालुक्यात ५ ब्रास वाळू वाहतूक पासेसचे घरपोच वितरण सुरू
शिरपूर, ता. २० मे – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ३० एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच वाळू निर्गती धोरण २०२५ अंतर्गत शिरपूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार घरकुल लाभार्थ्यांना घरपोच ५ ब्रास वाळू वाहतूक पासेसचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
राज्यातील वाळू धोरणाच्या अनुषंगाने घरकुल लाभार्थ्यांना स्थानिक वाळवंटातून वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांच्या २८ मार्च २०२० च्या अधिसूचनेनुसार APPENDIX-IX मधील तरतुदीनुसार लिलाव न गेलेले आणि पर्यावरण मान्यता प्राप्त वाळूगटांमधील वाळू स्थानिक वापरासाठी वापरण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार शिरपूर तालुक्यातील पाच गावांतील गटविकास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या यादीनुसार ऑफलाईन वाळू वाहतूक पासेसचे वितरण सुरू करण्यात आले आहे. संबंधित ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक हे लाभार्थ्यांच्या घरी जाऊन थेट पासेस देत आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ६६२ लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. गावानिहाय लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:
करवंद – १८४
मांडल – ८१
ऊपर पिंड – ६४
खामखेडा प्र.था. – ७३
लोंढरे – २६०
या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना घरकुल उभारणीसाठी आवश्यक असलेली वाळू वेळेवर आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत या कामाला गती मिळत आहे.
या उपक्रमाचे स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त केले जात असून, प्रशासनाचे या उपक्रमातील नियोजन व अंमलबजावणीसाठी कौतुक होत आहे.
